नाशिक : खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रिडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम सर हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अंजली भागवत हिने व्यक्त केले.निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी, संजीव लाटकर, अशोक कोठावळे, अभिजित बाम उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी बाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, बाम सर हे नेहमी आम्हा महिला नेमबाजपटूंना ‘चिमण्या’ म्हणून लाडाने बोलवत असे. त्यांनी आंतरमनाविरुध्द कृती करण्याचे धाडस माझ्यामध्ये निर्माण केले.आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचे सोने क रता येईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते; मात्र बाम सरांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या ‘टिप्स’मुळे हे शक्य झाले. त्यांच्यासोबतचा सहवास माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. एकाग्रता, आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा हे सरांकडून शिकायला मिळाले. गुरूवर्य बाम सरांचा आवाज आमचा विश्वास होता. गुरू म्हणजे विश्वास असतो आणि त्यांच्या ‘टिप्स’वर विश्वास दाखविला की मग जगही जिंकता येते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते बाम सरांच्या मना सज्जना व मनोपासना या दोन पुस्तकांसह स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. धर्माधिकारी यांनीही मनोगतातून बाम यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक डॉ. भरत केळकर यांनी केले व सुत्रसंचालन लेखक वंदना अत्रे यांनी केले.
बाम सर हे खेळाडूंचे एक विश्वच : अंजली भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 8:53 PM
निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
ठळक मुद्देआम्हा महिला नेमबाजपटूंना ‘चिमण्या’ म्हणून लाडाने बोलवत असे. त्यांच्यासोबतचा सहवास माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही