पन्नास वर्षे जुने झाड : पिंपळपारावरील वटवृक्ष कोसळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:24 PM2020-05-13T20:24:53+5:302020-05-13T20:41:19+5:30
लॉकडाउन सुरू असल्यामुळे वर्दळ फारशी नसल्याने जीवीतहानीचा धोका टळला. संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वटवृक्षाचा बुंधा जमिनीतूनच उन्मळल्याने हे झाड झपकन खाली कोसळले.
नाशिक : जुन्या नाशकातील नेहरू चौकातील पिंपळपारासमोर असलेला सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे जुना वटववृक्ष बुधवारी (दि.१३) वादळी वाऱ्याने उन्मळून पडला. प्रचंड विस्तार अन् दाट पर्णसांभार असलेला हा वटवृक्ष अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे.
बुधवारी संध्याकाळी सुटलेल्या वादळी वा-याने हा वटवृक्ष धरातिर्थी पडल्याने झाडाच्या सावलीला उभ्या असेल्या चारचाकी मोटारींचे नुकसान झाले. लॉकडाउन सुरू असल्यामुळे वर्दळ फारशी नसल्याने जीवीतहानीचा धोका टळला. संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वटवृक्षाचा बुंधा जमिनीतूनच उन्मळल्याने हे झाड झपकन खाली कोसळले. यावेळी मोठा आवाजही परिसरात ऐकू आला. झाडाच्या सावलीला रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार मोटारी फांद्यांखाली दाबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच शिंगाडातलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून जवान बंबासह घटनास्थळी अवघ्या काही मिनिटांतच दाखल झाले. तत्काळ जवानांनी पेट्रोलकटरच्या सहाय्याने कोसळलेल्या वटवृक्षांच्या फांद्या कापून त्याखाली दाबल्या गेलेल्या मोटारी मोकळ्या केल्या. वटवृक्षाच्या दाट पर्णसांभारामुळे उन्हाळ्यातसुध्दा पांथस्थांना या चौकात अल्हाददायक वातावरण अनुभवयास येत होते. ऐन उन्हाळ्यात वटवृक्ष कोसळल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
वटवृक्ष सुमारे तीस ते चाळीस वर्षे जुना होता. तांदूळबाजार, दुधबाजार, गौरीबाजार या चौकात याच झाडाच्या सावलीला तेव्हा भरत असे. हा वटवृक्ष मी शाळकरी वयापासून बघत आलो आहे. या झाडाच्या सावलीखाली निवृत्तीदादा बर्वे, काकासाहेब सोलापूरकर, माजी नगरसेवक रघुवीर भालेराव यांचा व्यवसाय होता. या झाडाच्या सावलीखाली मीदेखील तांदूळविक्री केल्याचे आठवते.
- शंकर बर्वे, सामाजिक कार्यकर्ते