नाशिक : कालिका देवीचा यात्रोत्सव दुसऱ्या माळेला रंगात आलेला सोमवारी (दि.३०) पहावयास मिळाला. गडकरी चौक सिग्नल ते गुरुद्वारारोड कॉर्नरपर्यंत मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी टप्प्याटप्प्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत, मात्र या बॅरिकेडमुळे भाविकांना अडथळा निर्माण होत असून ‘बॉटल नेक’ तयार होण्याचा धोका होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.यात्रोत्सवानिमित्त भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले बॅरिकेड योग्य आहे. परंतु गडकरी चौकापासून तर थेट गुरुद्वारा रस्त्याच्या वळणापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने बॅरिकेड उभे करण्यात आले आहेत. ज्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूने गडकरी चौक ते थेट महामार्ग बसस्थानकाच्या दिशेने डाव्या बाजूने विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या मध्यभागीदेखील काही विक्रेत्यांनी दुकाने उभारल्याने भाविकांना मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. तसेच पोलिसांचे बॅरिकेडदेखील यादरम्यान लावले गेले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.भाविकांची गर्दी अचानकपणे वाढल्यानंतर बॅरिकेडजवळ कोंडी निर्माण होऊ लागते त्यामुळे चेंगराचेंगरीचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तातडीने रस्त्याच्या मध्यभागी लावलेले बॅरिकेड हटविण्याची मागणी होत आहे. मंदिराजवळ सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान ‘देवदूत’ वाहनासह २४ तास सज्ज आहेत, मात्र या जवानांना निवाºयाचीदेखील कु ठलीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना रस्त्यावरच दिवस-रात्र काढावी लागत आहे.गर्दीत वाढ; दर्शनासाठी रांगसोमवारी सकाळपासून शहरात कडक ऊन पडले होते, मात्र दुपारनंतर अचानकपणे शहरात ढग दाटून आले आणि सरींचा वर्षावदेखील झाला. चार वाजेपर्यंत पाऊस सुरू राहिला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने यात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीत वाढ होऊ लागली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुन्हा हलक्या सरी कोसळल्याने काही वेळ यात्रेत तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मात्र या सरी अवघ्या काही मिनिटांतच थांबल्या. रात्री दहा वाजेपर्यंत यात्रोत्सव चांगलाच बहरला होता.
कालिका देवी यात्रोत्सवात बॅरिकेड्सचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:47 AM