कोरोनाच्या लढाईत पोलीस पाटलांचे कार्य कोरोना योद्धयां प्रमाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 06:25 PM2020-08-26T18:25:05+5:302020-08-26T18:25:51+5:30
सिन्नर: जगात कोरोना ने थैमान घातल्यावर कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांबरोबरच शिक्षक, सफाई कामगार, वैद्यकीय क्षेत्र पुढे सरसावले. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा असलेल्या पोलीस पाटलांनी निभावलेली भूमिका प्रशंसनीय आहे.
सिन्नर: जगात कोरोना ने थैमान घातल्यावर कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांबरोबरच शिक्षक, सफाई कामगार, वैद्यकीय क्षेत्र पुढे सरसावले. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा असलेल्या पोलीस पाटलांनी निभावलेली भूमिका प्रशंसनीय आहे. जनमानसात दिवसेंदिवस कोरोनाची भीती कमी होत असताना बाधित यांची संख्या वाढत आहे. पुढील काळात कोरोना सोबत जगतांना पोलीस पाटलांना अधिक सतर्क राहावे लागेल असे निफाडचे विभागीय पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांनी वावी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावच्या पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करतांना सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक गोडबोले, सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे, वावीचे सपोनि रणजीत गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मुकेश कापडी, उपाध्यक्ष संदीप कुटे, सामाजिक कार्यकर्ते अजित सेंदर, संजय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी कोरोना योद्धा म्हणून या काळात महत्वाची भूमिका पार पाडली ते अभिनंदनास पात्र आहे असे पडिले म्हणाले.
वावी पोलीस स्टेशनच्या मैदानात आयोजित या सत्कार समारंभात पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पडिले यांनी प्रत्येक पोलिस पाटलांशी वैयक्तिक संवाद साधत स्थानिक परिस्थिती जाणून घेतली. पोलीस खात्यास योग्य वेळी असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. अजित सेंदर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.