लुटुपुटुची लढाई, नागरिकांचा जीव घेई !
By श्याम बागुल | Published: March 31, 2018 12:46 AM2018-03-31T00:46:31+5:302018-03-31T00:46:31+5:30
देशपातळीवरील असुरक्षिततेचे वातावरण, असामाजिक तत्त्वांनी वर काढलेले डोके, गुन्हेगारी टोळ्यांनी मांडलेला उच्छाद व दिवसाढवळ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी करण्यासाठी टपून बसलेल्या चोरट्यांनी अगोदरच त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा देण्याऐवजी पोलीस आयुक्तालयाने वारंवारची लुटुपुटुची लढाई खेळण्यासाठी उठविलेली शहरभर आवई नागरिकांच्या जिवावर उठू लागली आहे.
नाशिक : देशपातळीवरील असुरक्षिततेचे वातावरण, असामाजिक तत्त्वांनी वर काढलेले डोके, गुन्हेगारी टोळ्यांनी मांडलेला उच्छाद व दिवसाढवळ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी करण्यासाठी टपून बसलेल्या चोरट्यांनी अगोदरच त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा देण्याऐवजी पोलीस आयुक्तालयाने वारंवारची लुटुपुटुची लढाई खेळण्यासाठी उठविलेली शहरभर आवई नागरिकांच्या जिवावर उठू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमूक ठिकाणी बॉम्ब सापडला तर तमूक ठिकाणी सशस्त्र अतिरेकी शिरल्याच्या पोलिसां करवी घडविल्या जाणाऱ्या घटनांच्या नुसत्याच कल्पनेने अगोदरच घाबरलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठाव चुकू लागला असून, खरोखरच नाशिक शहर इतक्या धोकेदायक वळणावर येऊन ठेपले काय? असा प्रश्न विचारू लागले आहेत. कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याच्या वारंवार केल्या जाणाºया नुसत्या घोषणांनीच नाशिककर निश्चिंत व निवांतपणे सुखनैव जीवन जगत असताना गेल्या काही महिन्यांपासून मात्र नाशिककरांना कायम असुरक्षिततेची जाणीव करून देण्याचा चंगच पोलीस आयुक्तालयाने बांधला की काय? अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून, नुकतीच शहरात रामरथ मिरवणूक मोठ्या शांततेत पार पडली आहे, गुरुवारी शहरात ‘अहिंसा परमो धर्मा’ची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडत असताना शहरातील कॅनडा कॉर्नर येथील दूरसंचार भवनात बेवारस बॅग सापडल्याचा व त्या बॅगेत बॉम्बसदृश वस्तू असल्याची अफवा पोलीस आयुक्तालयाने उठविली. तत्पूर्वी नुसता बॉम्ब सापडल्याच्या अफवेने नाशिक शहरातील शांतताप्रिय नागरिक व दूरसंचार भवनाला लागून असलेल्या व्यावसायिकांची पाचावर धारण बसली. यातून पोलीस आयुक्तालयाने काय साध्य केले हे जाणून घेण्याचा नागरिक प्रयत्न करीत असताना शुक्रवारी पुन्हा शहरातील एका मध्यवस्तीतील उंची हॉॅटेलमध्ये अतिरेकी शिरल्याचा बनाव पोलिसांनी रचला आणि त्यासाठी अख्ख्या नाशिककरांना वेठीस धरले. चांडक सर्कल ते मुंबई नाक्यापर्यंतचा संपूर्ण रस्ताच निर्मनुष्य करण्यात आला. मुळात शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या या भागात चार मोठे इस्पितळे आहेत, लगतच शासकीय विश्रामगृह, विभागीय आयुक्तांचे निवासस्थान, व्यावसायिक शोरूम व विशेष करून मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले आहेत. पोलिसांनी या साºया गोष्टी डोळ्याआड करून संपूर्ण रस्ताच जवळ जवळ दीडतास बंद करून टाकला. रस्त्यावर सशस्त्र पोलीस व कमांडोची गस्त अनेकांच्या छातीत धडकी भरवून गेली, तर लहान मुले व वृद्ध इसमांनी भीतीपोटी स्वत:ला घरात कोंडून घेतले. नागरिकांंना रस्त्यावर जाण्या-येण्यास मज्जाव करण्याबरोबरच घर, दुकानाच्या बाहेर येण्यास प्रतिबंध करण्यात आला, दुसरीकडे मात्र ज्या हॉटेलमध्ये अतिरेकी शिरल्याची अफवा पोलिसांनी उठविली, त्या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या अभ्यागतांना येण्या-जाण्यासाठी पूर्णपणे मुभा देण्यात आली एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवणाखानासाठी किंबहुना कॉफीशॉपमध्ये जाणाºया ग्राहकांनाही मज्जाव करण्यात पोलिसांचा बंदोबस्त अपुरा पडल्याचा अनुभव नागरिकांनी याची देही डोळा पाहिला. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांच्या या लुटुपुटुच्या लढाईच्या वृत्ताने भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत, शनिवारी शहरात तिहेरी तलाक विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, तर अक्कलकुवा ते नाशिक अशा ‘बिºहाड’ मोर्चाचेही आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना शहरवासीयांना आश्वासित करण्याऐवजी पोलिसांनी नागरिकांना घाबरवून सोडण्यातच धन्यता मानली आहे.