नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण केल्यानंतर कमी दूषित, अधिक दूषित व पाणी पिण्यायोग्य असे तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते. जून महिन्यात म्हणजेच पावसाळा सुरू होऊन काही कालावधी उलटत नाही तोच पाणी पुरवठा विभागाने अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले असता तपासलेल्या १८९४ नमुन्यांपैकी १६० गावांमधील पाणी दूषित म्हणजेच पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित गावातील ग्रामपंचायतींना पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे मलेरिया, हिवताप, थंडी-ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागालाही त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.
-------------
तालुकानिहाय आढावा
कळवण- ३०२-९
बागलाण- ९६-२
मालेगाव- ९७-४
नांदगाव- ८३-९
चांदवड- ९०- ६
देवळा- ६०-०
सुरगाणा- १६९-९
पेठ- १०५-०
येवला- ९६-२
निफाड- १५६-१
इगतपुरी- ११६-११
नाशिक- ६४- १४
दिंडोरी- २२४-६८
सिन्नर- ६७- १२
त्र्यंबकेश्वर- १६९-१३
------------
ज्या गावात तपासणी झालीच नाही त्याचे काय?
* पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावर प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाण्याचे नमुने दरमहा घेतले जातात.
* अशा प्रकारचे नमुने दरमहा घेतले जातात. घेतलेले नमुने साधारणत: सलग तीन वेळा दोेषविरहीत आढळल्यास अशा गावांमध्ये पुन्हा तपासणी करण्याची गरज नसते.
* ज्या गावांमध्ये पाण्याची तपासणी झालीच नाही, अशा गावांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेऊन वेळच्या वेळी पाणी नमुने तपासून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.
-----------
कोरोनामुळे नमुने घटले
* गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यापासून ग्रामीण भागही सुटला नाही. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याचे नमुने घेण्यात काही प्रमाणात अनियमितता आली.
* सप्टेंबर महिन्यापासून पाण्याचे नमुने पुन्हा तपासण्यास सुरुवात झाली आहे. गावोगावी जाऊन पाण्याचे नमुने घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे नसल्याने दरमहा सर्वच गावात पाणी नमुने घेणे शक्य नसते.
* कोरोना व अन्य कारणांमुळेही पाण्याचे नमुने घेणे अशक्य होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, बऱ्याच वेळा ठराविक गावांतील पाण्याचे नमुने रॅन्डमली घेतले जातात.
--------------
* पाण्याचे नमुने तपासणी ही नियमित चालणारी बाब असून, दूषित पाणी पुरवठा होत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिले जाते.
* पाणी कमी दूषित असल्यास पिवळे कार्ड व पाणी शुद्ध असल्यास ग्रीन कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे ग्रामपंचायतींनी काय उपाययोजना केल्या, त्याची पाहणी होते.
------------
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!
* दूषित पाण्यामुळे साथ रोगांबरोबरच गंभीर स्वरुपाचे आजार होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचाही संभव आहे.
* मलेरिया, हिवताप, हगवण, वांत्या, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे, अशा सूचना आहेत.
* पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी पाणी शुद्ध असणे व त्यापेक्षा पाणी उकळून पिणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
--------------
१,८९४ गावांचे नमुने घेतले तपासणीसाठी
१६० गावातील नमुने आढळले दूषित