नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. महापालिकेच्या न्यू बिटको रुग्णालयात सातशे खाटांची व्यवस्था असली तरी ती आता नऊशेवर गेली आहे; परंतु रुग्ण दाखल होण्याचे थांबत नाही. नाशिक शहरातूनच नव्हे तर अगदी सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक, निफाड, धुळे जळगाव अशा सर्व भागांतील बाधित मिळेल त्या साधनाने नाशिक शहराकडे उपचारासाठी मोठ्या अपेक्षेने धाव घेतात. खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नाही आणि शासकीय- निमशासकीय रुग्णालयात जागा नाही, असे बिकट चित्र आहे. सोमवारी (दि.१९) नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात भेट दिल्यनंतर अनेक प्रकारची धक्कादायक माहिती समोर आली.
याठिकाणी व्हरांड्यात आणि रिकाम्या खाेलीत अनेक बेड्स वापराविना पडून आहेत. महापालिकेने तशी याठिकाणी हजार बेडची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे; परंतु केवळ पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने बेड वाढवता येत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे एक तरी बेड उपलब्ध करून द्यावा यासाठी आक्रोश करणारे नातेवाईकही दिसले. तोपर्यंत रुग्ण आणलेल्या गाडीतच बसून, झोपून असतात; परंतु त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणाला वेळ नाही.
महापालिकेचे हे रुग्णालय परिपूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे; परंतु कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. पुरेसी साधने उपलब्ध होत नाही, अशा वेळी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा कितपत पुरणार, असा प्रश्न आहे.
इन्फो..१.
पाच व्हेंटिलेटर पडून
सध्या शहरात खासगी रुग्णालयात देखील ऑक्सिजन बेड मिळत नाही. तोही मिळेल; पण व्हेंटिलेटर बेड तर नशिबानेच मिळू शकेल, अशी स्थिती आहे. बिटको रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स केवळ किरकोळ पार्ट जो अगदी पाच पन्नास रुपयांना मिळू शकेल असे सांगितले जाते. तो उपलब्ध न झाल्याने व्हेंटिलेटर पडून आहे.
इन्फो...२
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात तर सीटीस्कॅन, एआरआय हे असूनही अपवादानेच सुरू असतात. केवळ बिटकोतील स्कॅनिंग बंद असल्याने गोरगरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना खासगी लॅबमध्ये रांगा लावून उभे राहावे लागते आहे.
इन्फो..३
फॉर्म, स्टेशनरीही संपली
रुग्णालयात दाखल करण्याच्या केस पेपरपासून मृत्यूचा दाखला देण्याच्या आधीचा अर्ज असो ही सर्वच स्टेशनरी संपुष्टात आली आहे. महापालिकेच्या मुख्यालयाकडून पुरवठाच होत नसल्याने एकच कोरा फॉर्म रुग्णांच्या नातेवाइकांना देऊन त्याची झेरॉक्स काढा आणि त्यात तपशील भरून आणा, असे सांगितले जाते.
कोट...
परिसरातील ग्रामीण रुग्णांसाठी महापालिकेचे बिटको रुग्णालय मोठा आधार आहे. मात्र, हे रुग्णालयात अनेक समस्या आहेत. कर्मचारी तर नाहीच; परंतु स्टेशनरीही उपलब्ध नाही. अनेक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांना दबाव आणि तणावाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने बिटको रुग्णालयाकडे लक्ष पुरवण्याची गरज आहे.
- जगदीश पवार, नगरसेवक