अन्नातील भेसळीचा संबंध थेट मानवी आरोग्याशी आणि जिवाशी असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची यावर करडी नजर असते. भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाकडून वेळोवेळी संशयास्पद छापे टाकून ते रोखण्याचे काम केले जाते. अन्न उत्पादक किंवा विक्रेत्याकडून लहानशी चूक झाली असेल किंवा दुर्लक्षामुळे काही घडले असेल त्याला कायद्यात माफी नाही. संबंधितांना दोन लाख रुपयांपासून दहा लाखापर्यंत दंड होऊ शकतो. चूक जाणूनबुजून करीत असेल तर सहा महिन्यांचा कारावास आणि कायमस्वरूपी दुखापत झाली असेल तर सात वर्षे आणि मृत्युमुखी पडल्यास उत्पादक किंवा व्यावसायिकास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग जागरुक आहे; पण हे केवळ प्रशासनाचेच काम आहे, असे म्हणून चालणार नाही. ग्राहकानेदेखील जागरुक राहणे आवश्यक आहे. बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे पॅकिंग व्यवस्थित आहे का, खाद्यपदार्थांची एक्स्पायरी डेट किती आहे, पदार्थ प्रमाणित केल्याचे नमूद आहे का, हे तपासले पाहिजे. साधारणत: भडक रंगाची मिठाई घेऊ नये. खाद्यपदार्थ तयार होण्याच्या आणि विक्रीच्या ठिकाणी
स्वच्छता आहे की नाही, या बाबी तपासून घेणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थांबाबत चुकीचे वाटत असेल तर प्रशासनाला कळविले पाहिजे आणि खरेदी करताना चोखंदळपणे पाहणे आवश्यक असल्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जाते. गेल्या सहा महिन्यांत जवळपास शंभर ठिकाणी छापे टाकून नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. लॅबचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.
साधारणत: श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा, गणेश चतुर्दशी, गौरी-गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांमध्ये दुग्धजन्य मिठाईचे पदार्थ, लाडू, चकल्या, गूळ, बेसन अशा अनेक पदार्थांना मागणी असते. ग्राहकांची खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भेसळ मोठ्या प्रमाणात होते. ग्राहक नेमका इथेच फसतो. या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.आपल्याकडे प्रामुख्याने दूध,पेढा, खवा, गोडेतेल, दुग्धजन्य मिठाई यामध्ये भेसळ आढळते. दूध व खव्यातील भेसळ शरीराला अपायकारक आहे. ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे.
- चंद्रशेखर साळुंखे सहायक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन (अन्न)