पाडवा पहाटमध्ये रंगणार भरत बलवल्ली यांची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:40 AM2018-11-01T01:40:41+5:302018-11-01T01:40:56+5:30
संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे.
नाशिक : संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे. संस्कृती प्रस्तुत पाडवा पहाट या सांस्कृतिक मैफलीचे यंदा १९ वे वर्ष असून, या मैफलीची तयारी महिनाभरापासून सुरू आहे. गेल्या १८ वर्षात पाडवा पहाटच्या मैफलीत अनेक दिग्गज गायकांनी आपली हजेरी लावत मैफलीत रंग भरला आहे. कर्नाटक राज्यातील अनोख्या गानशैलीने प्रसिद्ध असलेले गायक स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली हे शास्त्रीय गायनाबरोबरच नाट्यसंगीत, निर्गुणी भजन, दोहे यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना पखवाजावर दादा परब, आॅर्गनवर पंडित विश्वनाथ कान्हेरे, तबल्यासाठी पंडित प्रसाद करंबळेकर, बासरीवर वरद कठापूरकर आदी साथसंगत करणार आहेत. यावेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सहकार महर्षी बाळासाहेब वाघ यांचा संस्कृती पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.