नांदगाव तालुक्यातील अनेक भागात झालेल्या जोरदार पावसाने नांदगाव शहरातील लेंडी व शाकंबरी नदीला पूर आला होता. यात अनेक दुकाने, घरे वाहून गेली. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत धीर दिला. यावेळी पुराने प्रभावित बेघर झालेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. नांदगाव शहरातील ज्या भागात नागरिकांचे जास्त नुकसान झाले होते त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. महिलांना धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून सांत्वन केले, तर तत्काळ प्रांत, तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सर्व पीडित नागरिकांना तत्काळ वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्य सेवेची व्यवस्था करून देण्याच्या सूचना केल्या. नांदगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून, सुमारे २८ हजार हेक्टरपेक्षा अधिक असणाऱ्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या असून, ठिकठिकाणी पाझर तलाव संपूर्ण क्षमतेने भरून काही ठिकाणी ते फुटून मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या मृत पावल्या. सर्वांचे पंचनामे त्वरित करून त्यांना तत्काळ मदत करण्याच्या सूचना डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भाजप तालुकाध्यक्ष बापू जाधव, राजाभाऊ पवार, दत्तराज छाजेड, गणेश शिंदे, सचिन दराडे, उमेश उगले, संजय सानप, स्वप्निल शिंदे, विनोद अहिरे, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.
भारती पवारांची पूरग्रस्त भागाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:17 AM