भीमराज दराडे : पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कार्यशाळा मूलभूत सुविधांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:12 AM2018-03-11T00:12:02+5:302018-03-11T00:12:02+5:30
येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी.
येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी. यासाठी प्रशासन सर्व बाबतीत सहकार्य करण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन भीमराज दराडे यांनी येथे केले. ग्रामीण शेतशिवारातील कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेची माहिती देण्यासाठी येथील महात्मा फुले नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे होते. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, येवला उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक संस्थेच्या विनीता वाघ, सारिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी प्रास्ताविक केले. अॅड. माणिकराव शिंदे यांनी, पालकमंत्री योजनेंतर्गत शेतशिवारातील रस्ते झाले तर गावे तंटामुक्त होण्यास मदत होईल. पोलिसांचे कामदेखील कमी होईल. न्यायालयीन कामकाजातील शेतबांध व रस्ते यावरून असलेले वाद निकालात निघतील, असे मत मांडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित गटविकास अधिकारी सुनील अहिरे, उपअभियंता वाघ, जलसंधारणच्या सहायक कार्यकारी अभियंता सोनल पाटील, बाळासाहेब लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख, नायब तहसीलदार सविता पठारे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मजूर फेडरेशनचे माजी संचालक गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना पालकमंत्री शेत- पाणंद रस्ते योजनेची प्रत्येक गावात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाची प्रत देण्यात आली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी संतोष तरटे, उत्तम खांडवे, शरद घाडगे, आनंद शंकपाळ, विजय चव्हाण, विशाल राऊत, विलास साबळे, रमेश कुंभार्डे, सुधीर पाटसकर यांनी परिश्रम घेतले. दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी आभार मानले.