जिल्ह्यात भुजबळांच्या अटकेचे पडसाद
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:30+5:302016-03-16T08:36:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी अटक केल्याच्या
अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबागच्या तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले.
भुजबळ यांना झालेली अटक बेकायदा आहे. भाजपाच्या दबावामुळे सुडात्मक कारवाई केली आहे. सरकारच्या या कृत्याचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यात येत असल्याचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे. भुजबळ आमचे नेते आहेत, त्यांना झालेल्या बेकायदेशीर अटकेविरोधात रास्ता रोको करण्यात येणार होता, मात्र सध्या परीक्षांचा हंगाम सुरु असल्याने निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
खालापुरात रास्ता रोको
खालापूर : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वा.च्यासुमारास खोपोली व खालापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये व एक्स्प्रेस वे वाहतुकीचा खोळंबा होवू नयेत म्हणून खोपोली व खालापूर पोलिसांनी खालापूर टोलनाक या आंदोलन स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता .
महाडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
महाड : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अटकेच्या निषेधार्थ महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्त रोको केले. यावेळी सुमारे वीस कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांची सुटका केली. यावेळी काही काळ महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुभाष निकम आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नाते खिंड येथे रास्ता रोको करण्यात आले.
मुंबई - पुणे महामार्गावर रास्ता रोको
वावोशी : खालापूर तालुका व खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अंकित साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई - पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते, परंतु खालापूर उपविभागीय डीवायएसपी बी. पी. कल्लुरकर, खालापूर पोलीस निरीक्षक रामगुडे यांच्या पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनास विरोध केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
माणगावमध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको
माणगाव : माजी मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीने सोमवारी रात्री अटक केल्याच्या निषेधार्थ माणगावमध्ये मंगळवारी दुपारी २.३० वाजता तालुका अध्यक्ष बाबूराव भोनकर यांच्या नेतृत्वखाली रास्ता रोको करण्यात आला. मुंबई- गोवा रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रास्ता रोको केला.
तालुका अध्यक्ष बाबूराव भोनकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात आलेल्या अपयशामुळे जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे असा आरोप भोनकर यांनी केला. यावेळी आनंद यादव, संगीता बक्कम आदी उपस्थित होते.