नाशिक : तालुक्याचा पुर्व भाग असलेला दारणाकाठ बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाला आहे. या भागातील बिबट्यांचा संचार रोखण्यासाठी वनविभागाचे बोरिवलीचे पथक पुन्हा माघारी बोलविण्यात आले आहे. तसेच सोमवारी (दि.२९) राज्याचे पश्चिम वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दारणाकाठाला भेट देत बोरिवली, नाशिकच्या वन्यजीव बचाव पथकाला विविध उपाययोजनांबाबत सुचना दिल्या.रविवारी (दि.२८) सामनगावमध्ये एका चार वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालून जखमी केल्याची घटना घडली. दारणाकाठालगतच्या आठ ते दहा गावांमध्ये मागील तीन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. या भागात एप्रिलपासून अद्याप तीन मुले, एक वृध्द असे चार बळी गेले आहेत तर दोघा चिमुकल्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. ऊसशेतीचा विस्तर्ण परिसर असल्यामुळे या भागात बिबट्यांचा सुळसुळाट होऊ लागला आहे. या भागातील बिबटे जेरबंद करण्यासाठी सातत्याने नाशिक पश्चिम वनविभाग प्रयत्न करत असून अद्याप यश आलेले नाही. आठवडाभरापुर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर हे पथक तीन दिवस दारणाभागात तळ ठोकून राहिले; मात्र तेव्हा बिबट्याने कोठेही दर्शन दिले नाही किंवा पिंज-यातसुध्दा आला नाही. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश दस्तुरखुद्द वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. त्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर यांनीही स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या भागातील बिबट्याला थेट बेशुध्द करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.लिमये यांनी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्यासह दुुपारी चार वाजता सामनगावातून दारणाकाठाचा परिसर पिंजण्यास सुरूवात केली. येथील शेतक-यांशीसुध्दा त्यांनी यावेळी संवाद साधला. रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली. तसेच वनविभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबतही सांगितले.ऊसशेतीचे बिबट ‘रेस्क्यू’पुढील मोठे आव्हानदारणानदीकाठालगतचे सामनगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चाडेगाव या भागात लिमये यांनी पथकासह पाहणी दौरा केला. येथे असलेली ऊसशेती हे बिबट जेरबंद करण्यापुढील मोठे आव्हान ठरत आहे. तसेच बिबट्यांच्या वाढत्या संख्येलासुध्दा हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले.बारा दिवसांत दुसरा हल्लाबारा दिवसांपुर्वी ११ जून रोजी संध्याकाळी गुंजन नेहरे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. ही घटना सामनगावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वर गावात घडली होती. या घटनेला बारा दिवस पुर्ण होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने चार वर्षाच्या ओमवर हल्ला चढविला. यामुळे पसिरात बिबट्याची कमालीची दहशत पसरली आहे.