त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 04:29 PM2019-11-28T16:29:04+5:302019-11-28T16:29:50+5:30
वावीहर्ष शिवारात बकरीवर हल्ला
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील चाकोरे, तळवाडे, पहिणे, अंबई, देवगाव टाके, देवगाव, धाराची वाडी, कळमुस्ते, जांभुळवाडी, निरगुडे, वावीहर्ष तसेच तळवाडे शिवारात ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, बिबट्याने वावीहर्ष येथील शेतकऱ्याच्या घरात घुसून बकरीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यात बिबट्यांचा संचार वाढल्याने घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याने जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांच्यावर हल्ला करत फडशा पाडला आहे. याशिवाय, तीन महिन्यापूर्वी चाकोरे येथील खाडे नावाच्या शेतकºयावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. वावीहर्ष येथील बाबुराव बांगारे यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या शेतातील घरात घुसून बिबट्याने बकरीवर हल्ला केला. बकरीच्या मानेला पकडून घराचा कारवीचा कुड फाडून नेत असताना घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावावा, यासाठी त्र्यंबकेश्वर वनविभागाला अनेकदा कळविण्यात आले. परंतु, वनविभागाकडून अद्याप त्यावर काहीही उपाययोजना झालेली नाही. तालुक्यात एकापेक्षा जास्त बिबटे असावेत तसेच रानडुक्कर, तरस, कोल्हे आदी वन्यप्राणीही असल्याचे वन विभागाने मान्य केले आहे. गाव-शहरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर दहशत निर्माण करत असून वनविभागाने त्याबाबतीत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.