बिबटय़ाचा ३५ कडकनाथ कोंबडय़ांवर ताव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 03:50 PM2019-10-09T15:50:08+5:302019-10-09T15:51:27+5:30
वैतरणानगर (इगतपुरी) : तालुक्यातील शेवगेडांग येथे मंगळवारी (दि. ८) रात्री बिबट्याने धुमाकूळ घालत पोल्ट्रीफार्ममधील ३५ कडकनाथ कोंबड्यांचा फडशा पाडला.
वैतरणानगर (इगतपुरी) : तालुक्यातील शेवगेडांग येथे मंगळवारी (दि. ८) रात्री बिबट्याने धुमाकूळ घालत पोल्ट्रीफार्ममधील ३५ कडकनाथ कोंबड्यांचा फडशा पाडला. देवचंद भरीत यांच्या या कोंबड्या होत्या. या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी याच गावात एका घरामध्ये बिबट्या शिरला होता. त्यात एक महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. वनविभागाकडे बिबट्या पकडण्यासाठी मागणी केली होती. मात्र वनविभागाने अद्याप कुठलीही उपाययोजना केलेली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. शेवगेडांग हे गाव त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्याचा सरहद्दीवर असून, परिसरात इगतपुरी वनविभाग व त्र्यंबकेश्वर वनविभाग यापैकी कोणाचा अधिकार आहे हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तक्र ार करावी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. शेवगेडांग परिसरात बिबट्याची दहशत आहे. वेळोवेळी याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी कळविले आहे. मात्र अद्याप परिसरात वनविभागाचे कर्मचारी फिरकलेही नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यातच मंगळवारी भरीत यांच्या पोल्ट्रीफार्मवर बिबट्याने हल्ला करत ३५ कोंबड्या फस्त केल्या आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थ पुन्हा दहशतीखाली आले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने या भागात कायमस्वरूपी पिंजरा लावावा अशी मागणी विष्णू पोरजे, सरपंच साहेबराव खंडवी, देवचंद भरीत यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. यात भरीत यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.