निफाड : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या वतीने जीवदान मिळाले आहे. निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील रावसाहेब रामकृष्ण सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी (दि.२२) दुपारी १२ वाजेच्या बिबट्या पडल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले.कृषिपंपाला आधार देण्यासाठी असलेल्या वायरच्या रोपाचा आश्रय घेत होता. तत्काळ त्यांनी वनविभागाला माहिती दिली. येवला विभागाचे वनपरीक्षेत्रअधिकारी संजय भंडारी यांच्या सूचनेवरून विंचूरचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक भैया शेख, आर. एल. भोरकडे यांचे पथक सुंदरपूर येथे पोहोचले.विहिरीत १५ फूट पाणी होते. पथकाने नागरिकांच्या मदतीने दोराला पिंजरा बांधून खाली सोडला. १५ मिनिटात पिंजऱ्यात प्रवेश केला.बिबट्याला निफाड वनविभागाच्या नर्सरीत आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी तपासणी केली. मादी बिबट्या दीड वर्षाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सुंदरपूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 1:46 AM