नायलॉन मांजाने इसमाचा कापला गळा;पडले सात टाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:27 PM2021-01-07T14:27:50+5:302021-01-07T14:31:29+5:30
नायलॉन मांजाचा वापर ज्याअर्थी शहरात होत आहे, त्याअर्थी शहरातील विविध भागांमध्ये अगदी सहजरित्या नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे.
नाशिक : शहर व परिसरात नायलॉन मांजाने पक्ष्यांसोबत माणसेदेखील जखमी होण्याच्या घटना घडू लागल्या आहे. मखमलाबादरोडवरील दुचाकीस्वार युवती जखमी होण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इंदिरानगर भागात एका चाळीशीच्या इसमाच्या गळ्याभोवती नायलॉन मांजाचा फास लागून गंभीर दुखापत झाली. त्यांचे दैव बलवत्तर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाशिक शहरातील ही तीसरी दुर्घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, इंदिरानगर भागातील रहिवासी मयुर कुलकर्णी (३५) हे कामानिमित्त दुचाकीने जात असताना इंदिरानगरमध्ये त्यांच्या गळ्याभोवती हवेतून तुटून आलेला नायलॉनचा मांजा घासला जाऊन दुखापत झाली. त्यांनी वेळीच त्यांची दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत तत्काळ कुलकर्णी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मांजामुळे गळ्याची त्वचा कापली गेल्याने त्यांना सात टाके पडले. सुदैवाने त्यांचे या दुर्घटनेत प्राण वाचले. नायलॉन माजांचा वापर त्वरित थांबविला जाणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटनांना आळा घालणे शक्य होणार नाही.
नायलॉन मांजा हा नाशिकरांसाठी कर्दनकाळ ठरु लागला आहे. तीन दिवसांपुर्वीच मखमलाबादरोडवरील हनुमानवाडी कॉर्नरच्या सिग्नलवर एका दुचाकीस्वार युवतीच्या गळ्याला नायलॉन मांजाने दुखापत झाली. त्याअगोदर द्वारका येथे दुचाकीस्वार भारती जाधव नामक महिलेचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच या आठवडभरात शहरात अद्याप दहा पक्षी नायलॉन मांजाच्या फासामध्ये अडकून विविध ठिकाणी झाडांच्या फांद्यावर तडफडत होते, त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत सुटका केली.
सोशलमिडियावरुन नायलॉन मांजा न वापरण्याचे साकडे
नायलॉन मांजाचा वापर करु नये, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा, यासाठी सामाजिक, राजकीय पर्यावरणप्रेमी संघटनांकडून जनप्रबोधन केले जात आहे. शहरातील सोशलमिडियावर यासंबंधीचे विविध पोस्ट, छायाचित्रे व्हायरल होऊ लागले आहे. नायलॉन मांजाचा वापर हा सजीवसृष्टीकरिता घातक असून हा वापर थांबवावा, याकरिता नाशिककरांना साकडे घातले जात आहे.
नायलॉन मांजाचा वापर ज्याअर्थी शहरात होत आहे, त्याअर्थी शहरातील विविध भागांमध्ये अगदी सहजरित्या नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे. चोरट्या मार्गाने होत असलेली नायलॉन मांजाची विक्री थांबवून संबंधित विक्रेत्यांविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरु लागली आहे.