‘बॉर्डर जंगल’ सुरक्षेवर तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:28 AM2019-03-21T00:28:04+5:302019-03-21T00:28:22+5:30
जंगल संरक्षणासाठी वनविभागाकडून पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. नाशिक पूर्व वनविभागाच्या हद्दीतील सुरगाणा, उंबरठाण आणि कनाशी या परिक्षेत्रांतर्गत गुजरात सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागातील जंगलाच्या सुरक्षेवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे.
नाशिक : जंगल संरक्षणासाठी वनविभागाकडून पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. नाशिक पूर्व वनविभागाच्या हद्दीतील सुरगाणा, उंबरठाण आणि कनाशी या परिक्षेत्रांतर्गत गुजरात सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागातील जंगलाच्या सुरक्षेवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. या भागात सुमारे पंधरा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या प्रत्येक नाक्यावर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवून ‘दक्षता’ घेतली जाणार आहे.
खैर, साग, शिसव, हळदू यांसारख्या मौल्यवान प्रजातींसह अर्जुनसादडा, उंबर, मोह यांसारख्या भारतीय प्रजातीची वनसंपदा गुजरात सीमेजवळ महाराष्टÑ वनविभागाच्या अखत्यारित आहे. या वनसंपदेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने नाशिक पूर्व, पश्चिम वनविभागाची आहे. हरसूल, पेठ, बारे हे तीन परिक्षेत्र पश्चिम विभागाच्या हद्दीत आहेत. पूर्व भागाच्या हद्दीतील तीन वनपरिक्षेत्रातील तपासणी नाके सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव ‘दक्षता’ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला जवळपास मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे यांनी दिली.
गुजरातमध्ये गुटखाविक्री व निर्मितीवर कुठलेही निर्बंध नसल्यामुळे काथ मिळविण्यासाठी या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर ‘खैर’ला मागणी आहे. त्यामुळे महाराष्टÑ-गुजरात सीमेवर नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील वनसंपदेवर गुजरातच्या तस्करांनी वक्रदृष्टी केली आहे. तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी सीमेलगत वनविभागाच्या पथकाकडून विविध प्रकारे खबरदारी घेतली जात आहे. मात्र स्थानिक बेरोजगार आदिवासींकडून तस्करांना मिळणारी साथ वनविभागापुढील मोठे आव्हान आहे. जनप्रबोधन तसेच उदरनिर्वाहासाठी वनोपजच्या माध्यमातून उत्पन्नाच्या नवनवीन संधीबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नाला काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद स्थानिकांकडून मिळू लागला आहे.
‘जीपीएस’मार्फत झाडांची गणना
पूर्व विभागाच्या हद्दीत असलेल्या वनसंपदेची गणना जीपीएससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. प्रत्येक झाडावर अनुक्रमांक वनरक्षकाकडून लिहिला गेला आहे. त्यामुळे वनरक्षकाला झाडाची ओळख व माहिती ठेवणे सोपे होत आहे. या भागातील मौल्यवान प्रजातींसह अन्य प्रकारच्या सुमारे चार ते पाच हजार झाडांवर लाल रंगाने क्रमांक टाकले गेले आहेत.