बिर्याणी पडली महागात; मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 01:47 AM2022-05-05T01:47:44+5:302022-05-05T01:47:58+5:30
किरकोळ वादातून मित्राचा खून करणाऱ्या कांतीलाल धनाजी शेळके रा. समर्थनगर, ता. गंगापूर, जि औरंगाबाद याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मालेगाव : किरकोळ वादातून मित्राचा खून करणाऱ्या कांतीलाल धनाजी शेळके रा. समर्थनगर, ता. गंगापूर, जि औरंगाबाद याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दि. १७ जानेवारी २०१७ रोजी बागलाण तालुक्यातील कऱ्हे येथील किल्ला सरा डोंगराच्या पायथ्याशी योगेश सयाजी मांडवडे यांच्या शेत गट क्रमांक ४० मध्ये विहीर खोदकाम सुरू होते. रात्री जेवणाला बसल्यानंतर मला बिर्याणी का कमी दिली या कारणावरून कुरापत काढून कांतीलाल धनाजी शेळके याने निवृत्ती उर्फ विशाल किसन विटेकर याला लोखंडी फावड्याने गंभीर स्वरूपाची मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला होता तर अन्य दोघा जणांनी प्रेत झाडाझुडपात लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला येथील अपर सत्र न्यायालयात सुरू होता. यातील आरोपी शेळके याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर या घटनेतील संशयित आरोपी बसराज चव्हाण हा मयत झाला आहे तर हरिभाऊ मुरलीधर वाघ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अशोक एन. पगारे यांनी कामकाज पाहिले.