बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:47 AM2019-09-25T00:47:29+5:302019-09-25T00:47:54+5:30
अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
नाशिकरोड : अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत बिटको चौक, शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली सर्व प्रकारच्या वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. बिटको चौकात सिग्नल सुटल्यानंतर खड्ड्यामुळे वाहने धीम्या गतीने जातात. त्याचवेळी दुसरा सिग्नल सुटत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच शिवाजी पुतळा उड्डाणपुलाखाली चौकातदेखील खड्डे पडले असून, पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. यामुळे वाहनधारक खड्डा वाचविण्यासाठी आडवीतिडवी वाहने चालवत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. डांबर वाहून गेल्याने रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यामुळे वाहने हळूहळू तेथून जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन गोंधळ निर्माण होतो. बिटको व शिवाजी पुतळा चौकात सार्वजनिक वाहतुकीची वर्दळ आहे. तसेच दत्तमंदिर रोडवरून गायखे कॉलनी जलतरण तलाव रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनधारक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
उड्डाणपुलाखालील भाजीबाजार स्थलांतरित करण्याचे प्रयत्न यापूर्वी अपयशी ठरले आहेत. सदर बाजार याचठिकाणी राहणार असेल तर अधिकृतपणे नियोजनबद्ध बाजारासाठी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने पे अॅण्ड पार्किंग, नो पार्किंग झोन निर्माण करण्याची गरज आहे. परंतु नाशिकरोडमधील केवळ बिटको चौकमध्ये तर सर्वत्र वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे, बाजारपेठ असो की बसस्थानक कुठेही वाहतूक नियोजन आणि पार्किंग सुविधा यांचा विचार झाल्याचे दिसत नाही. या साऱ्या प्रकारामुळे नाशिकरोडचा वाहतूक प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी नाशिकरोडच्या सुशोभिकरणासाठी भूमिका घ्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
अतिक्रमणाला कोण जबाबदार?
नाशिकरोडमधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बिटको चौकात वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगचे कोणतेही नियोजन नसल्याने या चौकाचा श्वास कोंडला आहे. वास्तविक नाशिकरोडचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने या चौकाचा नियोजनबद्ध विकास होणे अपेक्षित होते. मात्र उदासीन प्रतिनिधी आणि सामाजिक संस्था याबाबत फारसे आग्रही दिसून येत नसल्याने महापालिकेने नेहमीच बिटको चौकाकडे दुर्लक्ष केले आहे. उड्डाणपुलामुळे नाशिकरोडचे सौंदर्य वाढण्यास मदत होणे अपेक्षित असताना या उलट कोंडी आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचे चित्र दिसून येते. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.