सत्तेसाठी भाजपकडून ईडीचा गैरवापर : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 01:23 AM2021-07-03T01:23:34+5:302021-07-03T01:24:08+5:30
कोणत्याही प्रकारे सत्ता मिळावी, यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सत्ता नसल्याने भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली असल्याची टीकादेखील भुजबळ यांनी यावेळी केली.
नाशिक : कोणत्याही प्रकारे सत्ता मिळावी, यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सत्ता नसल्याने भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली असल्याची टीकादेखील भुजबळ यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात ईडीची कारवाई होत असल्याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर निशाणा साधला. ईडीची कारवाई करून मंत्र्यांविरोधात चौकशीचा फास आवळला जात असून हे सर्व काही सत्तेसाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ता कशी मिळेल, यासाठी कुणावरही आरोप करणे, तपास यंत्रणांची नोटीस पाठविणे असे प्रकार सुरू झाले आहेत. हे सर्व कशासाठी चालले आहे, हे लोकांना माहीत असून तेच त्यांना उत्तर देतील, असेही ते म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर येथील साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईविषयीदेखील त्यांनी शंका उपस्थित केली. पवारांच्या आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच अन्य काही मंत्र्यांविरोधात कारवाई केली जात असून हे सर्वकाही सत्तेसाठीच सुरू असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करताना शहरात स्मार्ट सिटीची अपेक्षित कामे होऊ शकली नसल्याचेही ते म्हणाले. महापालिकेची बससेवा सुरू होत असून ही सेवा महापालिकेला परवडणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुंबईची बेस्ट बससेवा वगळता इतर कुठेही प्रवासी बससेवा फायद्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका बससेवा सुरू करीत असली तरी तिची उपयुक्तताही पाहिली जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.