नाशिक- रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर महापालिकेने बसवलेले मोठे घड्याळ बंद पडले असून त्याबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला पत्र दिले आहे. सदरचे घड्याळ दुरूस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२००२-२००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वतीने महापालिकेने हे घड्याळ बसविले. परंतु हे घड्याळ अधून मधून बंदच असते. त्यामुळे यात्रेकरू आणि नागरीकांची गैरसोय तर होतेच शिवाय महापालिकेचा भोंगळ कारभार उघड होतो. त्यामुळे महापालिकेने गणेश वॉच कंपनीला देखभाल दुरूस्तीचे काम दिले आहे. मात्र त्यासाठी असलेले सुमारे एक लाख रूपयांचे देयक थकवले असून कंपनीला देखील काम करणे कठीण झाले आहे. लोकमतने या अनागोंदी कारभारावर वृत्त देताच आता घड्याळ दुरूस्तीसाठी जगदीश पाटील यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले आहे.
महापालिकेच्या वतीने देखभाल दुरूस्ती करणाऱ्या एजन्सीला देयक मिळाले नसून त्यामुळे घड्याळ बंद पडले आहे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी आणि घड्याळ त्वरीत दुरस्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.