लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रकारच्या खेळींना जिल्ह्यात राष्टÑवादीने त्याच भाषेत प्रत्युत्तर देत ऐन उमेदवारी वाटपात त्याची परतफेड केली. भाजपच्याच नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून काही ठिकाणी भाजपसमोर, तर काही मतदारसंघामध्ये सेनेवर राष्टÑवादीने मात केली. ऐनवेळी पक्षप्रवेश व उमेदवारीचे वाटप करत राष्टÑवादीने सामाजिक समीकरणे साधून आपली ‘बहुजन’ प्रतिमा उजळविण्याची संधी यानिमित्ताने साधून घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीने चाललेल्या राजकीय चाली पाहता, निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांचे हिशेब चुकते करण्यात राष्टÑवादी यशस्वी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात युतीविरुद्ध आघाडी अशीच लढत होत असली तरी, काही मतदारसंघांमध्ये मात्र तिरंगी वा चौरंगी लढतीचे चित्र आहे. युतीच्या जागावाटपात सेनेपेक्षा भाजपात राजी-नाराजीचे अधिक प्रदर्शन झाल्याने त्याचा पुरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न राष्टÑवादी कॉँग्रेसने केला आहे. भाजपात पंचवीस वर्षे सक्रीय राहिलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांना गळास लावून नाशिक पूर्वमधून राष्टÑवादीने नुसतीच उमेदवारी दिली नाही, तर भाजपासमोर कडवे आव्हान उभे केले, त्याच प्रकारे देवळाली मतदारसंघातून भाजपाच्याच नगरसेविकेस उमेदवारी देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला घाम फोडला आहे. सिन्नर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर उमेदवारी देताना राष्ट्रवादीने खेळी खेळली. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणारे भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनाच राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी बहाल केली. त्यामुळे या मतदारसंघात सेनेसमोर राष्टÑवादी कॉँग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. कळवण मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाशी मैत्रिपूर्ण लढत देत असतानाच, नाशिक पश्चिम मतदारसंघात माकपाला थेट पाठिंबा जाहीर करून भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्यासमोर लढत उभी केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया देवळाली मतदारसंघात भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडले. भाजपच्या अहिरे यांच्यामुळे शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला असून, घोलप यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघात राष्टÑवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून राष्ट्रवादीने आपल्या वाट्याचा मतदारसंघ कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्यासाठी सोडला. शेवाळे यांच्या पाठीशी समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात राष्टÑवादी यशस्वी झाल्याने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना जाळ्यात ओढून ऐनवेळी उमेदवारी दिली व त्यानिमित्ताने भाजप व पर्यायाने राहुल ढिकले यांचाही वचपा काढला आहे. काही दिवसांपूर्वी ढिकले यांनी पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली होती व राष्टÑवादीने सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु ऐनवेळी ढिकले भाजपकडे झुकल्याने त्यांच्याविरोधात भाजपाच उमेदवार देऊन राष्टÑवादीने आपल्याकडे अनेक पर्याय शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे.