वालदेवी नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह आले हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 02:02 PM2020-09-02T14:02:02+5:302020-09-02T14:06:54+5:30
चेहडी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या महादेव मंदिरालगतच्या एका खडकाच्या खाली पाण्याच्या भोव-यात अजिंक्यचा मृतदेह जवनांना आढळून आला.
नाशिक : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मंगळवारी (दि.१) वालदेवी नदीपात्रात गेलेले दोघे गणेशभक्त बुडून मरण पावले. पहिली घटना देवळाली गावाच्या शिवारात तर दुसरी घटना चेहडी पंपीगस्टेशनजवळ घडली. या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य क रत बाहेर काढले.
नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. यावेळी गणरायाला निरोप देताना देवळाली गाव येथे वालदेवी नदीकिनारी वडारवाडीमधील युवक नरेश नागेश कोळी (३६)हा वालदेवी नदीमध्ये बुडाला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह नाशिकरोड अग्निशमन दलाच्या पथकाच्या हाती लागला. दरम्यान, दुसरी घटना चेहडी पंपिंग स्टेशनजवळील दारणा-वालदेवी नदी संगमावर घडली. या ठिकाणी विसर्जनासाठी गेलेला अजिंक्य राजाभाऊ गायधनी (२२) हा युवक बुडाला. घटनेची माहिती मिळताच रबरी बोट, गळ आदि सामुग्री घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अजिंक्यचा शोध घेण्याचा प्रयत्न जवानांकडून संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आला; मात्र त्याचा मृतदेह हाती आला नाही. अंधार झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. बुधवारी (दि.२) सकाळी मुख्यालयाचे उपअधिकारी उप अधिकारी अनिल जाधव, फायरमन नाना गांगुर्डे, मनोहर गायकवाड, शिवाजी खुळगे, काका आडके, राजू आहेर, रमेश दाते आदींनी चेहडीजवळील वालदेवी नदीपात्रात शोध सुरु केला. यावेळी चेहडी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या महादेव मंदिरालगतच्या एका खडकाच्या खाली पाण्याच्या भोव-यात अजिंक्यचा मृतदेह जवनांना आढळून आला.