म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 06:59 PM2019-08-03T18:59:57+5:302019-08-03T19:00:16+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी लागला. सदर युवक हा काळेवाडी येथील सावळेराम काशीनाथ मेंगाळ हा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी लागला. सदर युवक हा काळेवाडी येथील सावळेराम काशीनाथ मेंगाळ हा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.
मंगळवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर युवक नदीपात्रात पडला होता. नदीला दुसऱ्यांदा मोठा महापूर आला होता. त्यावेळी सावळेराम काशीनाथ मेंगाळ (३५) हा काळेवाडी येथील युवक गण्याडोह बंधाºयावरून जात असताना वाहून गेला होता. ठाणगाव ग्रामस्थ व शासकीय यंत्रणेच्या वतीने बेपत्ता युवकाची शोध घेतला जात होता. संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीचे पाणी कमी होत नसल्याने शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. शनिवारी सकाळी म्हाळुंगी नदीला पुन्हा एकदा जोरदार पूर आला. त्यानंतर गण्याडोहापासून दोनशे मीटरच्या आसपास बाभळीच्या झाडाजवळ बेपत्ता युवकाचा मृतदेह दिसल्याने काळेवाडी येथील ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. पाच दिवसापासून पाण्यात प्रेत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिन्नर व ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांना जागेवरच बोलवून शवविच्छेदन करण्यात आले. कामगार, तलाठी वाय. आर गावित यांनीही पंचनामा करून शासकीय मदत मिळविण्याची मागणी केली. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.