स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू; अमित शाह, उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा
By Suyog.joshi | Published: April 2, 2024 08:51 AM2024-04-02T08:51:51+5:302024-04-02T08:52:34+5:30
नाशिक मतदारसंघात निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला तरी निवडणुकीची तयारी मात्र राजकीय पक्षांकडून केली जात आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांसाठी नाशिकचे गोल्फ क्लब मैदान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या मैदानाची १५ ते १८ मे रोजीची बुकिंग महापालिकेकडे संबंधित पक्षांनी नोंदवली आहे. यात १५ मे रोजी ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, १६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, १७ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि १८ मे रोजी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक मतदारसंघात निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला तरी निवडणुकीची तयारी मात्र राजकीय पक्षांकडून केली जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांकरता विशेषत: गोल्फ क्लब मैदानाला पसंती मिळत आहे. शिवाय राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांकडून आतापासूनच या मैदानाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नेत्यांच्या जाहीर सभांकरता मैदान मिळावे यासाठी महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडे अर्ज सादर करण्यात आले आहे.
... तरच सभेला मिळते परवानगी !
यंदाची निवडणूक बघता शहरात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभा व मेळाव्यांसाठी शहरातील मैदाने उपलब्ध व्हावीत म्हणून मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो. या दाखल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परवानगीसाठी सादर केला जातो. त्यानंतर सभेला परवानगी दिली जाते, अशी माहिती मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाच्या वतीने देण्यात आली.