‘त्या’ दोघींंची तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:42 AM2021-03-04T01:42:42+5:302021-03-04T01:43:39+5:30
महिला समुपदेशन केंद्रात पोहोचलेल्या पती-पत्नींच्या वादाबाबत कारवाई न करता वाद मिटविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजारांची मागणी करत लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी महिला हिरा सुभाष शिरके (७०) यांच्यासह महिला केंद्राच्या समुपदेशक संशयित शीला नामदेव सूर्यवंशी यांन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.३) न्यायलयीन कोठडी मंजूर केली.
नाशिक : येथील महिला समुपदेशन केंद्रात पोहोचलेल्या पती-पत्नींच्या वादाबाबत कारवाई न करता वाद मिटविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजारांची मागणी करत लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी महिला हिरा सुभाष शिरके (७०) यांच्यासह महिला केंद्राच्या समुपदेशक संशयित शीला नामदेव सूर्यवंशी यांन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.३) न्यायलयीन कोठडी मंजूर केली.
तक्रारदार यांचा त्यांच्या पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे पटत नसल्याने दुरावा निर्माण झाला. त्यांच्या समुपदेशनाकरिता महिला समुपदेशन केंद्राकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. या प्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई न करता संशयित लाचखोर महिला समुपदेशक सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली.
तक्रारदाराकडून खासगी महिला हिरा शिरके या लाचेची रक्कम स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. महिला समुपदेशक सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून रक्कम घेतल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित दोन महिलांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोघींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्या वयोमर्यादेचा विचार करत न्यायालयीन कोठडी मंजूर करत जामीन अर्ज फेटाळून लावला.