ब्रह्मगिरी पर्वत अवतरले टपाल पाकिटावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:27 AM2018-10-22T01:27:25+5:302018-10-22T01:27:41+5:30
गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) समारोप करण्यात आला.
नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) समारोप करण्यात आला.
नाशिक टपाल विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शन शनिवारपासून महात्मा फुले कलादालनात सुरू होते. शनिवारी मुंबई क्षेत्राच्या जनरल पोस्टमास्तर शोभा मधाळे यांच्या हस्ते ‘ब्रह्मगिरी’ पर्वताचे छायाचित्र असलेल्या विशेष पाकिटाचे अनावरण सकाळच्या पहिल्या सत्रात करण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वताचे महत्त्व लोकांपुढे यावे, या उद्देशाने टपाल विभागाने या प्रदर्शनाच्या निमित्ताने या विशेष पाकिटाचे लोकार्पण केल्याची माहिती मधाळे यांनी यावेळी दिली. त्यानंतर तिकीट संग्रहाची आवड जोपासण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी टपाल तिकिटे व त्यांचे महत्त्व त्यांच्यापुढे विषद करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पारितोषिक मधाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी यांच्यासह परीक्षक प्रतिसाद नेऊरगावकर, उमेश काक्केरी हे उपस्थित होते. या टपाल तिकीट प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध संग्रहकांनी सहभाग नोंदविला होता. सुमारे अकरा वर्षांनंतर नाशिक विभागाला अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन आयोजित करण्याची संधी मिळाली होती. हे प्रदर्शन स्पर्धेच्या स्वरूपात भरविण्यात आले होते.