नाशिक : स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेच्या १५ दिवस आधी येणाऱ्या विषयांनाच बैठकीत मंजुरी देण्यात येईल, असे धोरण असताना मंगळवारी (दि.४) स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी ३५ कोेटींच्या घरकुलांच्या कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी नाकारण्यात आली. आता हा विषय सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.स्थायी समितीची बैठक रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच माजी राष्ट्रपती ए.पी.जे. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शैलेश सूर्यवंशी यांनी पूर्वीप्रमाणेच वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावा, असा ठराव मांडला. त्यास प्रा. अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. १४व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत स्तरावर पोहोचल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. तत्पूर्वी हा निधी ग्रामपंचायत स्तरावर पोहोचला असून, अद्याप खर्च करण्याबाबतचे आदेश नसल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी १५ आॅगस्टला जिल्ह्यात ध्वजारोहणाबरोबरच सर्वच शाळांमध्ये वृक्ष लागवड करण्याचा शासन निर्णय असल्याची माहिती दिली. जिल्ह्यात शासन निर्णय होण्यापूर्वीच ‘एक मूल एक झाड’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांंगितले. रवींद्र देवरे व प्रवीण जाधव यांनी स्थायी समितीत केवळ ठरावच होतात. त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. वित्त आयोगाच्या निधीबाबत चार महिन्यांपूर्वीच ठराव होऊनदेखील तो शासनास सादर करण्यात आलेला नाही. तो तसाच धूळ खात पडून असल्याचे सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी सभांमध्ये केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यात येणार नसेल तर यापुढे स्थायीची सभा घेण्यात येणार नाही, असे प्रशासनाला सुनावले. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, किरण थोरे, शोभा डोखळे, उषा बच्छाव, सदस्य प्रशांत देवरे, प्रवीण जाधव, रवींद्र देवरे, गोरख बोडके, शैलेश सूर्यवंशी, प्रा.अनिल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आयत्या वेळीच्या कामांच्या मंजुरीला ‘ब्रेक’
By admin | Published: August 04, 2015 11:33 PM