निफाड/नायगाव : निफाड तालुक्यात एचआयव्ही तपासणीनंतरच वधू-वर बोहल्यावर चढण्याच्या निर्णयाला ११९ ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे हिरवा कंदील दिला आहे.महाराष्ट्रातील निफाड उपजिल्हा रुग्णालयात येथील एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राची राज्यात पहिली अॅक्टिव्हिटी ठरली आहे. निफाड तालुक्यातील समुपदेशक नितीन परदेशी यांनी राबविलेल्या प्रयोगास तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींनी गावात लग्नाआधी युवक व युवतींनी एचआयव्ही तपासणी करूनच गावातील मुला-मुलींचे लग्न करण्याचा ठराव बहुमताने सहमत केला आहे. तसेच गाव व परिसरातील एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्णांबाबत भेदभाव व कलंकित भावना न करण्याबाबतही ठराव मंजूर करण्यात आले. तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींपैकी ६७ भित्तिफलक रंगवून या दुर्धर आजाराविषयाची जनजागृती व आजाराविषयी घ्यावयाची काळजी तसेच औषधोपचार मिळण्याचे ठिकाण आदींबाबतची माहिती असलेले फलक ग्रामपंचायतींच्या सौजन्याने रंगविण्यात आले आहेत.निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुनील राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्टÑीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत स्तरापर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने तालुक्यातील ग्रामपंचायतीत एचआयव्ही एड्स आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्रीय व मूलभूत माहिती दिली. एचआयव्ही तपासणी कोठे केली जाते व प्रत्येक गर्भवती मातेने पहिल्या तीन महिन्यात आपली नाव नोंदणी व एचआयव्ही तपासणीबाबत जनजागृती करण्यात आली. मोहीम राबविण्यासाठी सहायक गटविकास अधिकारी आर.आर. सानप, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, व्यवस्थापक योगेश परदेशी, के.टी. गाडद, एस.के. सोनवणे, पौर्णिमा कोंडके आदींचे सहकार्य लाभले.
आजच्या आधुनिक जमान्यातही अशा आजारांबाबत समाजात प्रखर जनजागृती करूनही रु ग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे कलंक व भेदभाव समाज स्वीकृती, सामाजिक, नैतिक जबाबदारी व बांधिलकी याची उत्तम खूणगाठ बांधून ठेवण्याकरिता हा प्रयत्न होता. यापुढेदेखील असाच प्रयत्न राहणार आहे.- नितीन परदेशी, समुपदेशक, निफाड