बीएसएनएल कर्मचाºयांनी रोखले : संपामुळे ग्राहक सेवा केंद्रापासून सर्व कामे ठप्प महाप्रबंधकांना ‘कार्यालयबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:13 AM2017-12-13T01:13:29+5:302017-12-13T01:14:35+5:30
प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या.
नाशिक : प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या. विशेष म्हणजे निगमचे महाप्रबंधक नितीन महाजन यांना संचार भवनातील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कर्मचाºयांनी रोखून जवळपास घेरावच घातल्याने त्यांना कार्यालयात न जाताच माघारी फिरावे लागले.
या संपात जिल्ह्यातील अकराशे अधिकारी, कर्मचारी, अभियंता सहभागी झाले आहेत. बीएसएनएल कर्मचाºयांच्या वेतन करारास व्यवस्थापन समिती आणि बोर्डाने मान्यता दिली असून, हा प्रस्ताव डीओटीकडे पाठविण्यात आला आहे. तथापि, वेतनवाढीचा संबंध कंपनीच्या नफ्याशी जोडला जात असून, हा प्रकार अन्यायकारक असल्याचे युनियन व असोसिएशनचे म्हणणे आहे. बीएसएनएल ही सामाजिक उद्दिष्टासाठी सरकारने स्थापन केलेली कंपनी असून, कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करूनही दुर्गम भागात सेवा देत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कंपनीचा विकास होऊ शकलेला नाही. सरकारने कंपनीच्या सर्व आर्थिक सवलती काढून घेतल्या तसेच गुंतवणुकीसाठी भांडवल नाही. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार नाही त्यातच कंपनीचा हजारो कोटी रुपयांचा निधी सरकारने शून्यावर आणला असून, खासगी कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण झाले. तरीही कर्मचाºयांनी खासगी स्पर्धेच्या तोडीस तोड सेवा दिल्याने कंपनी आॅपरेशनल प्रॉफीटमध्ये आली आहे, असे असतानाही डीओटी आणि डीपीई वेळकाढूपणा करून कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कर्मचारी संघटनांचा आरोप असून, त्या पार्श्वभूमीवर संप करण्यात आला आहे. मंगळवारी निगमच्या मुख्यालयासमोर संपकरी अधिकारी आणि कर्मचाºयांनी निदर्शने केली. त्यात एम. बी. सांगळे, एस. ए. भदाणे, राजेंद्र लहाणे, डी. एम. गोडसे, तिवडे, एल. एम. शिंदे, बाविस्कर सहभागी झाले होते.