टाक्या उभारणार; पण आॅक्सिजन कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:56 AM2020-09-07T00:56:23+5:302020-09-07T00:56:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील कोरोना-बाधितांसाठी लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढत असताना दुसरीकडे उत्पादकांकडूनच अडचणी येत असल्याने रुग्णांची अवस्था बिकट आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेने आॅक्सिजनसाठी टाक्या तयार करण्याची तयारी सुरू केली असली तरी आॅक्सिजनच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील कोरोना-बाधितांसाठी लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढत असताना दुसरीकडे उत्पादकांकडूनच अडचणी येत असल्याने रुग्णांची अवस्था बिकट आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेने आॅक्सिजनसाठी टाक्या तयार करण्याची तयारी सुरू केली असली तरी आॅक्सिजनच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न केला जात आहे.
दरम्यान, महापालिकेने तीन ठिकाणी टाक्या बांधण्याची तयारी केली असली तरी मुळातच टाक्यांचीदेखील टंचाई आहे, त्या उपलब्ध झाल्या तर लिक्विड आॅक्सिजनचा प्रश्न कसा सोडवणार, हा मूलभूत प्रश्न आहे. शिवाय कोरोनाचे संकट आता असले तरी महापालिकेने टाक्या भाड्याने घेऊन तब्बल दहा वर्षे त्याचे आणि गॅसपुरवठ्यासाठी सिलिंडर भाड्याने घेण्यासाठी निविदा काढल्या असल्याने आश्चर्य व्यक्तकेले जात आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मुंबई-पुण्यावरून लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक पुरवठादार हतबल झाले आहेत. मुंबई-पुणे, मुरबाड येथील उत्पादनाची क्षमता कमी पडत असल्याने त्यांच्याकडून टॅॅँकर येण्यास दोन ते तीन दिवसांचा विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा शसकीय रुग्णालयात वीस केएलची टाकी बसवण्यात येत आहे. नाशिक महापालिकाही बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अशाच प्रकारे टाक्या बसवणार आहे. त्यामुळे अडचण दूर होईल असे सांगितले जात असले तरी मुळात टाक्या बसवल्यानंतर तरी हा प्रश्न सुटणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यातही चेन्नई येथे दोन मोठे उत्पादक टाक्या तयार करतात, त्यांच्याकडेदेखील प्रचंड मागणी वाढल्याने टाक्याच उपलब्ध होत नसल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे त्या तत्काळ उपलब्ध होणेदेखील कठीण आहे.
नाशिक महापालिकेने तर घाईने टाक्या विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्याचा आणि दहा वर्षांसाठी भाड्यानेच लिक्विड आॅक्सिजन पुरवठ्यासाठी निविदा मागवल्या आहेत. मात्र, महापालिका स्वत: अशाप्रकारे टाक्या खरेदी करू शकते आणि दहा वर्षे लिक्विड आॅक्सिजन पुरवठा करण्याची तयारी करणेदेखील सलग अशीच कोरोना स्थिती राहील काय, याबाबत शंका उपस्थित करणाऱ्या आहेत. सद्य:स्थितीत लिक्विड आॅक्सिजन पुरवठ्याची कोणीही खात्री देऊ शकत नसल्याने महापालिकेने दोन ते तीन वेळा निविदा मागवूनदेखील पुण्याच्या एका ठेकेदाराचीच निविदा आली आहे; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे त्याबाबतदेखील वेगळाच वाद प्रवाद होण्याची शक्यता आहे.नवीन रुग्णालयांना परवानगी देण्याआधी...सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित दाखल करणे सक्तीचे केले जात आहे. अनेक नवीन रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव असून, त्यासंदर्भात खासगी रुग्णालयांना कळविण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयांना परवानगी देण्याआधी लिक्विड आॅक्सिजनचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.