नाशिक : देशभरात सिमेंट आणि स्टीलच्या किमतीमध्ये होणारी अवाजवी दरवाढ रोखण्यासाठी तसेच सिमेंट व स्टील कंपन्यांवर नियंत्रक प्राधिकरणाच्या नेमणुकीसाठी देशभरातील बांधकाम व्यावसायिक शुक्रवारी (दि.१२) देशव्यापी संप करणार आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियासह बांधकाम क्षेत्रातील विविध व्यावसायिक संघटनांनी या बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकही सहभागी होणार आहे.
बांधकामासाठी लागणाऱ्या स्टील व सिमेंटच्या दरात गेल्या तीन महिन्यांत सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इमारत व पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रातील बांधकामांच्या खर्चातही ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने सामान्यांना घरे परवडेनाशी झाल्याचे बीएआयकडून नमूद करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रातील या साहित्य दरवाढीचा परिमाण सरकारी कामे व इन्फ्रा स्ट्रक्चरची कामे यांना मोठा फटका बसणार असून त्यामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीतच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिमेंट व स्टीलसारख्या महत्त्वाच्या सहित्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रक प्राधिकरण नेमण्याच्या मागणीसाठी तसेच दरवाढीच्या निषेधासाठी नाशिक जिल्ह्यातील बांधकामे बंद ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे निवेदनही देण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी व माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.