सराफ बाजार आठवडाभर राहणार ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:22 AM2020-07-06T00:22:19+5:302020-07-06T00:22:56+5:30
सराफ बाजार परिसरात शनिवारपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण सराफ बाजार पूर्णपणे आठवडाभर लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
नाशिक : सराफ बाजार परिसरात शनिवारपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण सराफ बाजार पूर्णपणे आठवडाभर लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
सराफ बाजार परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून आले आहेत. सराफ बाजारातच निवासस्थान असलेल्या वाड्यात एका सराफी व्यावसायिकाचे संपूर्ण कुटुंबच बाधित आढळल्याने सराफी व्यावसायिकांनी एकत्रितपणे आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारपासूनच सराफ बाजार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये यापूर्वी २३ मार्चपासून सलग दोन महिन्यांहून अधिक काळ सराफ बाजार बंद होता. त्या काळात कोट्यवधींचे नुकसान सहन करुनदेखील सराफी व्यावसायिकांनी बंदचे काटेकोरपणे पालन केले. १७ मेनंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही दिवस दुकाने सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पावसाळ्यात बाजारात सर्वत्र पुराचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.
एकीकडे काहीच व्यवसाय होत नसताना धंद्याचेदेखील प्रचंड नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत सराफ बाजारातच काही कुटुंबात कोरोना बाधित आढळून आल्याने सराफ बाजार आठवडाभर बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे.