गुजरात राज्यात दारूबंदी आहे. सीमेलगतच्या राज्यातून चोरट्या पद्धतीने दारूची वाहतूक करुन चढ्या दराने गुजरातमध्ये विक्री होत असते. यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जातो. मालेगाव शहरातून गुजरात परिवहन मंडळाच्या बसमधून विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहूल पाटील, पोलीस हवालदार नरेंद्रकुमार कोळी, पंकज भोये, संदिप राठोड, शिवा परदेशी आदिंनी मोसमपूल ते सटाणानाका दरम्यानच्या रस्त्यावर गुजरात राज्य परिवहन मंडळाची बसची (क्रमांक जेजे १८ झेड ४५५६ ) तपासणी केली असता बस बॅटरी बॉक्समध्ये हिरव्या रंगाच्या कापडी बॅगमध्ये विदेशी दारूच्या १२ हजार ८२० रूपये किंमतीच्या १२ बाटल्या आढळून आल्या. सदरच्या बाटल्या बस चालक गोविंद वानखेडे यांनी विकत घेवून चढ्या दराने गुजरात येथे विकण्यासाठी घेतल्या असल्याचे चौकशीत समोर आले.
मद्याची तस्करी करणाऱ्या गुजरात परिवहन मंडळाच्या बस चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:44 PM