नाशिक : शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने शहर वाहतुकीची जबाबदारी घेणार आहे. परंतु ही सेवा खासगीकरणातूनच चालविली जाईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली आहे. शहरातील चांगल्या रुंद रस्त्यावर उत्तम फुटपाथ व्हावे यासह विविध सोयींसाठी अंदाजपत्रकांत विशेष तरतूद करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. राज्य परिवहन महामंडळ बससेवा चालविण्यास उत्सुक नाही. त्यामुळे महापालिकेने सार्वजनिक वाहतूक ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था समक्ष करण्याची वेळोवेळी मागणी होत असते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही तयारी केली असून, क्रिसिल कंपनीकडून अहवाल मागवला आहे. या कंपनीने महापालिकेने बससेवा चालविणे किंवा स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणजे कंपनी स्थापन करून सेवा देणे अथवा खासगी कंपनी, पीपीपी असे अनेक पर्याय सूचविले आहेत. तथापि, ही सेवा महापालिका स्वत: चालविणार नसल्याचे गांगुर्डे यांनी लोकमतच्या विचार-विमर्श अंतर्गत वाहतूक समस्येवर बोलताना स्पष्ट केले. नाशिक शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका विशेष लक्ष पुरवित आहे. त्याअंतर्गत वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी रविवार कारंजावरील महापालिकेची यशवंत मंडई पाडून त्या जागी बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली मोठी जागा उपलब्ध होईल असे ते म्हणाले. टिळकपथ सिग्नलजवळ वाहनतळाचे आरक्षण असलेली मोठी जागा महापालिका ताब्यात घेत असून, त्यामुळेदेखील काही प्रमाणात अडचण दूर होऊ शकेल, असे सांगून गांगुर्डे यांनी शहरातील वाहनतळाची आरक्षणे मूळ मालकाकडून विकसित करून घेतल्यानंतर वाहनतळाचा ताबाही मिळत नाही असा कटू अनुभव असल्याने यापुढे वाहनतळाच्या जागा समावेशक आरक्षण म्हणजे ए.आर.खाली घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासगीकरणातून बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:36 AM