जानोरी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांसाठी बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 04:50 PM2019-12-10T16:50:32+5:302019-12-10T16:50:51+5:30
शुभवर्तमान : जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सुविधा उपलब्ध
दिंडोरी : ग्रामीण भागात पक्के रस्ते आणि बससेवेअभावी आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी मैलोनमैल पायपीट करत शाळेत जाताना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक वाढते. जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा आणि विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग घेत वस्तीपासून शाळेपर्यंत बससेवा सुरू करत एक वेगळा आदर्श घडविला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बससेवा सुरू झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला आहे. खाजगी शाळेकडे कल वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचीही शाळा खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकाव आणि या शाळेकडेही पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांची गरज ओळखून वस्तीपासून शाळेपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला . त्यानुसार शिवाजीनगर पासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार व गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी भावसार यांनी जानोरी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे स्वागत केले. यातून नक्कीच मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होईल. ही सेवा निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.