नाशिक : कोविड विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बसस्थानके, आगार तसेच बससेची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असतानाही राज्यातील अनेक स्थानकांमध्ये स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याचे निरीक्षण मुख्यालयानेच नोंदविले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्याने आता राज्यात सर्वत्र १ डिसेंबरपासून बसस्थानके आणि बसेसची विशेष स्वच्छता केली जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी बसस्थानकावर अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. बसस्थानके, बसेस आणि आगार स्वच्छ असणेदेखील महत्त्वाचे असताना त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने महामंडळाविषयी प्रवाशांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे. याबाबतची गंभीर दखल महामंडळाने घेतली असून, सर्वच स्थानकांवर स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रवाशांना महामंडळाविषयी निर्माण झालेली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी येत्या १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानके, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, प्रतीक्षालये, उपाहारगृहे स्वच्छ करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. सद्यस्थितीत कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छता करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राधान्याने स्वच्छता करण्याचे फर्मान राज्यातील सर्वच विभाग नियंत्रणकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आता बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची जाणीव करून द्यावी, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात यावेत, स्थानकात स्वच्छतेचा संदेश देणारे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
--इन्फो--
-- असे करणार नियोजन--
वाहनतळाचा परिसर किमान दोन वेळेस स्वच्छ करण्यात येणार आहे, खासगी वाहनांना प्रतिबंध करून गर्दी कमी करण्यात यावी, आवारातील रिकाम्या बाटल्या, कागद उचलण्यात यावेत, पिण्याची पाण्याची टाकी स्वच्छ करावी, नळाची दुरुस्ती करण्यात यावी, बसस्थानकातील फलाटे नियमित स्वच्छ करावीत, प्रसाधनगृहे, चालक-वाहकांचे विश्रांतीगृहे स्वच्छ करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. स्थानकावर असलेल्या प्रत्येक कक्षाचे सॅनिटायझेन करण्यावर भर देण्यात येणार आहे. विभाग नियंत्रकांना या सर्व स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.