पंचवटी : जुना आडगाव नाका येथील पंचवटी बस आगारात सकाळी साडेनऊ वाजेला वर्कशॉपमधून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस आगारात असलेल्या वाहतूक नियंत्रक कक्षावर जाऊन धडकल्याने कक्षात असलेले पाच कर्मचारी जखमी झाले. सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये बसचालक, वाहतूक नियंत्रकांसह अन्य पाच जणांचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी की, जुना आडगाव नाका येथे बस आगारात सकाळच्या सुमाराला वर्कशॉपमध्ये बसचे काम केल्यानंतर दुरुस्ती झालेल्या बस बाहेर काढल्या जात होत्या. त्याच दरम्यान बस क्रमांक (एम. एच. १५ ए. के. ८०७१) वर्कशॉपमधील चालक घेऊन आला व त्याचवेळी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाकडून बसचे नियंत्रण सुटले व बस थेट बस आगारात असलेल्या पेट्रोल पंपाजवळील वाहतूक नियंत्रक कक्षाला जाऊन धडकली. या धडकेने नियंत्रक कक्षाची भिंत कोसळली तर कक्षात असलेले एस. एस. भास्कर, एस. डी. कोळी, इ. डी. वाजे, एस. एस. शिंदे, व्ही. एन. पाटील असे पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. बसची धडक कक्षाला बसल्याने भिंतीजवळ उभी केलेली एक लाल रंगाची दुचाकी दबली गेल्याने तिचे नुकसान झाले आहे. या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात घडल्यानंतर बस आगारातील चालक-वाहकांची एकच धावपळ झाली. घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. (वार्ताहर)
बसची नियंत्रक कक्षाला धडक
By admin | Published: March 11, 2017 1:31 AM