नाशिक : अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत शहरातील विविध शाळांमधून सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली असून ४,००१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ९६३ अर्जांची संबधित शाळांच्या मुख्यध्यापकांनी पडताळणीही केल्याची माहिती नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
मनपा हद्दीतील सुमारे १८१ माध्यमिक शाळांमध्ये शनिवारपासून माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. या पुस्तिकेवरील यूजरआयडी व पासवर्डचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग भरता येणार आहे, तर दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येणार आहे. परंतु, आॅनलाइन निकालापूर्वी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक पूर्ण भरून ६ जूनपर्यंत शाळा मुख्याध्यापकांकडून अप्रव्हू करून घ्यावा अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केल्या आहेत. नाशिक मनपा हद्दीतील शाळांमध्ये अकरावीसाठी बावीस हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहे. यात शहरात कला शाखेच्या चार हजार ८००, विज्ञान शाखेच्या नऊ हजार ५२०, वाणिज्य शाखेच्या सात हजार ७६०, तर कॉम्प्युटर सायन्सच्या ५६० जागांचा समावेश असून अकरावी प्रवेशसाठी बालभारतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयास ३० हजार माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या माहिती पुस्तिका शहरातील १८१ शाळांच्या माध्यमातून १ जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शाळांनी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका विक्रीसाठी वेगळे नियोजन केले असून प्रत्येक शाळेतू विद्यार्थ्यांना अर्ज उलब्ध करून देताना भाग एक भरण्यासाठीही मदत केली जात आहे. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका खरेदी केल्यानंतर त्यांना पुस्तिकेतील लॉगइन आणि आयडीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येईल. पुस्तिकेत दिलेल्या संकेतस्थळावर दहावीचा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची सर्व माहिती पहायला मिळेल. यात अकरावी प्रवेशासाठी आरक्षण प्रवर्ग, रहिवासी पत्ता, मोबाइल नंबरसह इतर माहिती विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे. ही माहीती ६ जूनपर्यंतच भरून ती मुख्याध्यापकांकडून अप्रूव्ह करून घ्यावी लागेल. तर निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीत मिळालेले गुण व इतर माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या भाग दोन मध्ये निकालाची माहितीही स्वयंचलितरित्या भरली जाणार आहे. त्या माहितीती विद्यार्थ्यांनी पडताळणी करून खात्री करून घेणे आवश्यक आहे. तर राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकालपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतर आॅनलाइन अर्जांची मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून पडताळणी करून घ्यावी लागणार असल्याची सूचना शिक्षक उपसंचालक कार्यालयाने केली आहे.