नाशिक : शहरासह जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी अचानकपणे दाखल झालेल्या १५४ उंटांनी नाशिककरांना जसा आश्चर्याचा धक्का दिला; तसा शासकीय-प्रशासकीय यंत्रणांच्या विविध विभागांपुढेही आव्हान उभे केले होते. तपोवनातून ताब्यात घेण्यात आलेले १११ उंट आणि मालेगावजवळ ताब्यात घेतलेले ४३ उंटांच्या संगोपनाची जबाबदारी मालेगावच्या गाेशाळा, चुंचाळेच्या पांजरापोळ संस्थांनी लीलया पार पाडली. दुर्दैवाने पांजरापोळमध्ये १२ आणि गोशाळेत एक असे १३उंट या कालावधीत मृत्यूमुखी पडले. पांजरापोळमधून ९७उंटांचा कळप राजस्थानच्या दिशेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी (दि.१९) पोलिस बंदोबस्तात रवाना झाला. गेली पंधरा दिवस ‘लोकमत’ने उंटांबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मुळभूमीत त्यांना पोहचविण्याचा निर्णय प्रशासनाने अखेर घेतला. मुळ राजस्थानच्या उंट संवर्धनासाठी कार्यरत संस्थाही प्रशासनाच्या संपर्कात आल्या आणि या उंटांचा अखेर मरूभूमीच्या दिशेने प्रवासक कुंभनगरीतून सुरू झाला.
साधारणत: वीस दिवसांपुर्वी अचानकपणे कुंभनगरी नाशिकच्या तपोभूमीत १११उंटांचा कळप काही प्राणीप्रेमींना नजरेस पडला होता. शहरात इतक्या मोठ्यासंख्येने उंट दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्राणीप्रेमी व आजुबाजुचे नागरिकही अवाक् झाले. पोलिसांनाही फोन फिरविले गेले अन् तेथून सरकारी यंत्रणा हलली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे सर्व उंट ताब्यात घेतले गेले आणि शहराजवळच्या चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये रात्री पोहचविण्यात आले. उंटांसोबत जे ‘मदारी’ लोक होते, त्यांच्या आधारकार्डावरील पत्ते नाशिक तपोवनातीलच आढळले. त्यांनी सुरूवातीला हे उंट आमचे वडिलोपार्जित असल्याचा दावा केला; मात्र या दाव्यावर ते ठाम राहिले नाही, अन् ठोस कागदपत्रेही सादर करू शकले नाहीत. या उंटांची अवस्था मरणासन्न झालेली होती. पशुसंवर्धन विभागाने पंधरा दिवस अथक परिश्रम घेत उंटांवर औषधोपचार केले. उंटांची प्रकृती सुधारावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या चमूने अथक परिश्रम घेत आपले कौशल्य पणाला लावले. दुर्दैवाने बारा उंटांना ते वाचवू शकले नाही. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून मार्गस्थ होत उंटांचा जथा दिंडोरी रोडवर दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षितरीत्या पोहोचला. उंटांना बघण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.आनंदाची बाब म्हणजे चार दिवसांपूर्वीच एका गर्भवती सांडणीने मालेगावच्या गोशाळेत ‘टोडिया’ला (उंटाचे पिल्लू) जन्म दिला.
दोन उंट नाशिकलाच!
पांजरापोळमधून कळप बाहेर पडताच त्यामधील एक उंट अचानकपणे प्रवेशद्वाराबाहेर कोसळला. यामध्ये एका उंटाच्या तोंडाला जखमाही झालेल्या आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यास पांजरापोळमध्ये ठेवण्यात आले आहे. एक्स्लो पॉइंटला चक्कर येऊन आणखी एका कमी वयाच्या उंटाने अस्वस्थ होऊन जमिनीवर बसून घेतले होते. त्यालाही त्वरित रेस्क्यू करीत पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी तातडीचे वैद्यकीय उपचार दिले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गिरीष पाटील यांनी सांगितले. सिडकोतील मंगलरूप गोशाळेत त्या उंटाचा पुढील काही दिवस सांभाळ करणार असल्याचे पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले.
उंटांच्या संगोपनासाठी या संस्था झटल्या
राजस्थानच्या सिरोहीमधील महावीर कॅमल सेंच्युरी, पाली जिल्ह्यातील सादडी येथील लोकहित पशुपालक संस्था, गुजरातच्या धरमपूरमधील श्रीमद राजचंद्र मिशन आणि नाशिकच्या मंगलरूप गोशाळा या संस्थांनी उंटांच्या संवर्धनासाठी चांगला पुढाकार घेतला. पंधरा दिवस पांजरापोळ संस्थेने शंभर उंटांचा सांभाळ केला. तसेच मालेगावच्या गोशाळेनेही ४३ उंटांचे संगोपन केले. तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सचिन वेंदे, डॉ. वैशाली थोरात, डॉ. संदीप पवार यांनीही सतत वॉच ठेवत उंटांना वेळोवेळी औषधोपचार दिले. यामुळे उंटांचा कळप पुन्हा राजस्थानच्या दिशेने कूच करू शकला.
लोकहित पशुपालक संस्थेचे सात रायकांची मोठी जबाबदारी
नाशिकमधील उंटांना त्यांच्या मातृभूमी राजस्थानपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पाली जिल्ह्यातील सादडी गावाच्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकहित पशुपालक संस्थेच्या सात ‘रायका’लोकांनी स्वीकारली आहे. रायका म्हणजे अर्ध भटका समाज जो राजस्थान, गुजरातमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना देवासी, रबारी अशा नावानेही ओळखले जाते. हा समाज पिढीजात उंटपालक म्हणून ओळखला जातो. उंटांचे पालनकरत आपली उपजिविका चालविणे हा या समाजाचा मुळ पारंपरिक व्यवसाय राहिला आहे.
मालेगावातील उंटांचा प्रवास अडकला ‘कोर्टा’त
मालेगावाच्या गोशाळेत दाखल असलेल्या ४२ उंट आणि एका नवजात पिल्लाचा राजस्थानच्या दिशेने होणारा प्रवास आता ‘कोर्टा’त अडकला आहे. शुक्रवारी उंटांचा जत्था प्रवास करू शकला नाही, कारण या उंटांसोबत जे लोक होते ते मुळत: अहमदनगरचे ‘मदारी’ लोक आहेत. त्यांनी उंटांवर दावा करत मालेगाव न्यायालयाकडे दाद मागितली. यामुळे उंटांचा या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर तालुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार उंटांच्या प्रवासाबाबत जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.