नाशिक: तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. मागील वर्षापासून उमेदवारांसाठी ऑनलाईन मेळावे घेतले जात आहेत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती आता भ्रमणध्वनीवरून घेतल्या जात असून पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महास्वयंम वेबपोर्टलवरून पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांनी सादर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या उमेदवारांची निवड संबंधित नियुक्ती धारकांकडून भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे.
कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन मेळावा आयोजित केला जातो. मागीलवर्षी मे महिन्यातही ऑनलाईन मेळावा घेण्यात आला होता. त्यानंतर जवळपास दहा मेळावे ऑनलाईन पार पडले. यावर्षी देखील चित्र फारसे बदलले नसल्याने ऑनलाईन मेळावा घेतला जाणार आहे. यावर्षी एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही ऑनलाईन मेळावे घेतले गेले आहेत. या माध्यमातून जवळपास ५०० उमेदवारांची प्रत्यक्ष निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये २४६ उमेदवारांना यावर्षीच संधी मिळून गेली.
यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या पाच मेळाव्यांमध्ये २१ कंपन्यांनी कौशल्य कामगारांसाठी मेळाव्यांमध्ये सहभाग घेतला. यासाठी तब्बल ३२९३ रिक्तपदांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी ६१०९ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यातील २१२६ उमेदवारांच्या मुलाखती होऊन ३६२ जणांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २४६ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले. सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या सप्ताहातही ऑनलाईन मेळावा होणार आहे. त्यामध्ये देखील जास्तीत जास्त उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे.