...अखेर गांजा तस्कर गोट्याला ठोकल्या बेड्या; पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:41 PM2020-12-19T19:41:10+5:302020-12-19T19:41:26+5:30
मुख्य सुत्रधारांपैकी फरार असलेल्या गोट्याच्या मागावर पोलीस होते; मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता.
नाशिक : वर्षभरापासून फरार असलेला गांजा तस्कर गोट्याला गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने तलाठी कॉलनी येथे सापळा रचून शिताफीने बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाची तपोवनातुन वाहतुक केल्याप्रकरणी मागील वर्षी सप्टेंबर महिन्याता गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्यात पोलिसांना गोट्या हवा होता.
तपोवनातून १० सप्टेंबर २०१९ साली गांजाची होणारी तस्करी पोलिसांनी रोखली होती. जयेश भाबड (रा.नाशिकरोड) व अमर बोरसे ऊर्फ गोट्या (रा.तारवालानगर) यांच्या मालकीचा गांजा वाहून नेला जात असल्याची माहिती त्यावेळी अटक केलेल्या प्रशांत गोविंद नारळे, युवराज गजेंद्र मोहिते, धनराज शिवाजी पवार यांनी पोलिसांना दिली होती. हे तीघे मारुती स्विफ्ट कारमधून अवैधरित्या ५ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ६५ किलो इतका गांजा वाहतुक करताना पोलिसांना आढळून आले होते. या गुन्ह्यात मुख्य सुत्रधारांपैकी फरार असलेल्या गोट्याच्या मागावर पोलीस होते; मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता.
उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी जुन्या यादीवर सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखांना दिल्यानंतर युनीट-१चे शिपाई राहुल पालखेडे यांना गोट्याबाबत गुप्त माहिती मिळाली. यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, संजय मुळक, विशाल काठे आदींनी तलाठी कॉलनी परिसरात सापळा रचला. येथील ५३ क्रमांकाच्या बंगल्यात वास्तव्यास असलेला अमर ऊर्फ गोट्या प्रकाश बोरसे (५३) यास पोलिासांनी अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली.