मकरसंक्रांत उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:24 PM2020-01-15T22:24:19+5:302020-01-16T00:35:08+5:30
वाढती महागाईतून मार्ग काढीत नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण गोड केला. यानिमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम साजरे करून तिळगूळ वाटून सण साजरा केला.
संगमेश्वर : वाढती महागाईतून मार्ग काढीत नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण गोड केला. यानिमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम साजरे करून तिळगूळ वाटून सण साजरा केला.
नूतन वर्षात पहिला येणारा मकरसंक्रांतीचा सण कौटुंबिक वातावरणात पुरणपोळी, तिळगूळ पोळी तयार करून साजरा करणयात आला. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाला आहे. वाढत्या महागाईतून मार्ग काढीत घरी बनविलेले तिळाचे लाडू वा विकत आणून एकमेकांना देत मनातील कटुता विसरून गोड गोड बोलण्याच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहर परिसरात खापराच्या पोळी विक्री केंद्राची अनेक केंद्रे उभारण्यात आली होती. नागरिकांनी येथून पुरणपोळी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. याशिवाय शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर वा गल्लीबोळात तिळगूळ, हलवा, लाडू विक्रीचे विशेष स्टॉल उभारण्यात आले होते. या ठिकाणी आबालवृद्धांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. बुधवारी सकाळपासूनच तरुणाईला पतंग उडविण्याचे वेध लागले होते. घराच्या टेरेस, धाबे, गच्चीवर सर्वच वयोगटातील नागरिक पतंग उडविण्याचा आनंद घेत होते. शहराच्या पश्चिम भागातील उंच इमारतीतील कुटुंबांनी पतंग उडवून पतंग काटा-काटीची मजा घेतली. विविध आकर्षक पतंगांनी आकाश व्यापले होते. सायंकाळी अंधार पडेपर्यंत नागरिक पतंग उडविण्यात दंग होते. सायंकाळी ठिकठिकाणी तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम झाला. महिला मंडळासह स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. महिलांनी ठिकठिकाणी हळदी-कूंकूचे आयोजन करून महिलांना वाण म्हणून भेटवस्तूंचे वाटप करीत संक्रांत सणाचा आनंद द्विगुणित केला. कॅम्पातील साने गुरुजी रुग्णालयाच्या वतीने वासंतिक वुमेन शिबिराला आजपासून प्रारंभ झाला. येत्या १५ एप्रिलपर्यंत हे शिबिर विनामूल्य असणार आहे, असे रुग्णालयाचे प्रबंधक जयेश शेलार यांनी सांगितले. याशिवाय महाप्रसाद वाटप, स्नेहमेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी इलेक्ट्रिक उत्पादने, दुचाकी, -चारचाकी वाहने, सुवर्णालंकार व इतर वस्तूंची खरेदी केली. समाजमाध्यमाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देण्यात नागरिक व्यस्त होते. आकर्षक संदेशाची देवाण-घेवाण करण्यात आली. अनेक गंमतीदार संदेशाचा आनंद नागरिकांनी घेतला.
बालाजी सेवा संस्थेच्या वतीने कार्यक्रम
बालाजी सेवा संस्थेच्या वतीने संगमेश्वरातील महादेव मंदिराच्या पटांगणात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. वर्धमान लोढा, आदिनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, कॅम्प वाचनालयाचे सचिव रमेश उचित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन आबा बागुल यांनी केले. आभार मनोज वारूळे यांनी मानले. बालाजी सेवा संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत मोहिते, चेतन लोखंडे, दीपक गुप्ता, प्रकाश सुराणा, डॉ. हिरे आदी उपस्थित होते.