‘एव्हिएशन विंग’ प्रदान : ‘कॅट्स’ची ४५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:08 PM2020-06-06T16:08:20+5:302020-06-06T16:12:10+5:30
४५ वैमानिकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर मास्क बांधून व शारिरिक अंतर राखून सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकारकडून कोरोना आजारापासून बचावासाठी सुचविण्यात आलेल्या सर्व उपायोजनांचे पालन करत सोहळा आटोपशीर घेतला गेला.
नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) १७ आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ४५ वैमानिकांची ३३वी तुकडी शनिवारी (दि.६) देशसेवेत दाखल झाली. स्कूलच्या कवायत मैदानावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी जवानांना ‘एव्हिएशन विंग’ सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आली; मात्र सालाबादप्रमाणे लष्करी थाटात पार पडणारा दिमाखदार सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द केला गेला.
भारतीय सैन्याची एक प्रशिक्षण संस्था म्हणून सैन्य प्रशिक्षण कमान्डच्या यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगरच्या कॅट्सची वाटचाल सुरू आहे. या सैनिकी प्रशिक्षण संस्थेला नुकतेच राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘प्रेसिडेन्ट कलर्स’चा सन्मानही प्रदान करण्यात आला आहे. या प्रशिक्षण केंद्रातून लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी वैमानिकांना दिले जाते. येथील प्रशिक्षण घेतल्यानंतर वैमानिक भारतीय सैन्य दलात लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून सेवा बजावतात.
१७ आठवड्यांचा प्रशिक्षण कालावधी पुर्ण होताच प्रशिक्षणार्थी वैमानिकांना शनिवारी पारंपरिक प्रथेनुसार कॅट्सचे कमान्डंट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ वैमानिकांना प्रदान करण्यात आली. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी वैमानिकांना विविध स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गेल्या डिसेंबर महिन्यात रंगलेल्या ३२व्या तुकडीच्या सोहळ्याप्रमाणे यंदाचा सोहळा पुर्णपणे वेगळाच होता. कारण या सोहळ्यावर कोरोना आजाराचे सावट होते. यामुळे वैमानिकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर मास्क बांधून व शारिरिक अंतर राखून सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकारकडून कोरोना आजारापासून बचावासाठी सुचविण्यात आलेल्या सर्व उपायोजनांचे पालन करत सोहळा आटोपशीर घेतला गेला.
...असे आहेत मानकरी प्रशिक्षणार्थी
कॅट्समध्ये १७ आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे यशस्वी प्रशिक्षण घेत असताना सर्वच गटांत उत्कृष्ट अशा अष्टपैलू कामगिरी करत कॅप्टन ओमकार लोखंडे यांनी मानाची ‘सिल्वर चित्ता’ व उत्कृष्ट उड्डाणाकरिता दिले जाणारे चषक पटकाविले. तसेच गुणवत्तापुर्ण कामगिरीसाठी देण्यात येणारी कॅप्टन एस.के. शर्मा स्मृति चषक कॅप्टन सुरज फर्तयाल यांनी तर कॅप्टन हरप्रित सिंग अरनेजा यांनी बेस्ट इन ग्राउंड विषयात नैपुण्य मिळविले. या तीघा उत्कृष्ट मानकरींना यावेळी गौरविण्यात आले.