सावधान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 09:34 PM2021-05-23T21:34:26+5:302021-05-24T00:26:01+5:30

नाशिक : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध रविवारी (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल झाले असले तरी अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ठाण मांडून बसला असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे.

Caution, Corona still stays in rural areas! | सावधान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा मुक्काम!

सावधान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा मुक्काम!

Next
ठळक मुद्देदहा हजारांहून अधिक रुग्ण : निर्बंध शिथिल होऊनही कोरोनाच्या संसर्गाची भीती कायम, बेफिकिरी अंगलट येण्याची शक्यता

धनंजय वाखारे,

नाशिक : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध रविवारी (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल झाले असले तरी अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ठाण मांडून बसला असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे.

गेले बारा दिवस कडक निर्बंध लावूनही मालेगाव शहरासह ग्रामीण भागात अद्यापही दहा हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. शिवाय, जिल्ह्यातील मृत्युदर वाढताच आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी दि. १२ ते २३ मे या कालावधीत निर्बंध आणखी कडक केले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवा मानल्या जाणाऱ्या किराणा दुकानांनाही टाळे लावण्यात आले होते. त्यांना केवळ घरपोच माल पोहोचविण्याची परवानगी देण्यात आली होती तर जिल्ह्यातील गर्दी जमवणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पेट्रोल पंपांवर अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन दिले जात होते. या कडक निर्बंधांची मात्रा लागू पडत गेल्या दहा-बारा दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय घटली. विशेषत: शहरी भागात त्याचा चांगला परिणाम दिसून आला. मात्र, ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या पाहिजे त्या प्रमाणात घटलेली नाही. शिवाय कोरोना बाधितांच्या बळींची संख्याही कमी झालेली नाही. बारा दिवसांचे कडक निर्बंध लागू करूनही ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अद्यापही दहा हजारांहून अधिक आहे. सद्य:स्थितीत २३ मे अखेर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६ हजार ६६ असून त्यात ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ९ हजार ४३५ इतकी आहे. तसेच मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६० रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कडक निर्बंधांमुळे नाशिक शहराची रुग्णसंख्या ८६३८ ने घटली असली तरी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या केवळ ३४६० ने घटली आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२ हजार ७९३ ने घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांची बेफिकिरी पुन्हा कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे कोरानाविषयक नियमांचे पालन अनिवार्य ठरणार आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या
नाशिक -- १,६८२
बागलाण -- ७२२
चांदवड ---६९५
देवळा---६४६
दिंडोरी--७७०
इगतपुरी--१७३
कळवण--५८५
मालेगाव--४७०
नांदगाव--४५९
निफाड--१,३१९
पेठ--७२
सिन्नर--१,१८१
सुरगाणा--२४०
त्र्यंबकेश्वर--१२६
येवला--२९५

कोविड सेंटर बंद करण्याची घाई नको
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींसह लोकप्रतिनिधी तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांनी विलगीकरण कक्षासह कोविड सेंटर सुरू केले. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडूनही ३१ कोविड सेंटर कार्यरत करण्यात आले. काही रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आता कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोविड सेंटर रिकामे होत आहेत. त्यामुळे काही भागातून हे कोविड सेंटर बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. परंतु, ग्रामीण भागातील कोरोनाची एकूणच स्थिती पाहता हे कोविड सेंटर अथवा विलगीकरण कक्ष बंद करण्याची घाई अंगलट येण्याची शक्यता आहे.

तुलनात्मक रुग्णसंख्या
विभाग १२ मे २३ मे
नाशिक ग्रामीण १२,८९५ ९,४३५
नाशिक शहर १४,२०९ ५,५७१
मालेगाव मनपा १,४९० १,०६०
एकूण २८,८५९ १६,०६६

Web Title: Caution, Corona still stays in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.