त्र्यंबकला मंदिरांमध्ये खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:58 AM2020-03-16T00:58:03+5:302020-03-16T00:59:31+5:30
कोरोना विषाणूचा सर्वांनीच धसका घेतला असून येथील विविध देवालयांमध्ये खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना मास्क तर भाविकांसाठी जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर उपलब्ध केले असून संसर्ग होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा सर्वांनीच धसका घेतला असून येथील विविध देवालयांमध्ये खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना मास्क तर भाविकांसाठी जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर उपलब्ध केले असून संसर्ग होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, गोदावरीचे उगमस्थान, संत निवृत्तिनाथांची संजीवन समाधी तसेच श्रीस्वामी समर्थ मंदिर, श्रीस्वामी समर्थ गुरु पीठ आश्रम, श्रीगजानन महाराज संस्थान, योग विद्या धाम तळवाडे तसेच परिसरातील गड, किल्ले पहाणारे पर्यटक यांची नेहमीच परिसरामध्ये गर्दी होत असते. तथापि कोरोनाच्या धास्तीने आता भाविक, पर्यटकांच्या गर्दीत घट झाली असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सूत्रांनी दिली. नेहमी शनिवार, रविवारी त्र्यंबकेश्वरला मोठी गर्दी होत असते. त्यामानाने रविवारी गर्दी खूपच कमी होती.
निवृत्तिनाथ मंदिरात त्यामानाने गर्दी कमी असली तरी वारकरी एकादशीला गर्दी करतात. त्यामुळे विश्वस्त मंडळाने अद्याप कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीच नियोजन केले नव्हते. येत्या २० तारखेला भागवत एकादशी असल्याचे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कर्मचाºयांना मास्क देण्यात येतील, असे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले.
गजानन महाराज संस्थान, श्रीस्वामी समर्थ केंद्र आदी ठिकाणी त्या त्या संस्थेने खबरदारी घेतली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयातील फक्त विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. १०वी ची परीक्षा वेळापत्रकानुसार होत आहे.