नाशिक : सीबीएसचा चौक खोदण्यास गेल्या रविवारी प्रारंभ होत नाही तोच आता अशोकस्तंभ चौक खोदण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे. त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, मंगळवारी (दि.२४) यासंदर्भात पाहणी करण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाब विचारला. ऐन सणासुदीचे दिवस त्यातच निवडणुका आणि आता सीबीएस आणि अशोकस्तंभ बंद होणार असल्याने नागरिकांनी शहरात जा-ये कशी करायची, असा थेट प्रश्नच परिसरातील व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानचे अवघे एक किलोमीटर रस्त्याचे काम दीड ते दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता रस्त्याचे काम पूर्ण होत आल्याचा दावा करीत स्मार्ट सिटीच्या वतीने सीबीएस चौक फोडून तेथे काम करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या रविवार (दि.२२) पासून नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे. हे काम सुरू होत असतानाच आता अशोकस्तंभ चौकदेखील फोडून त्याचे नव्याने काम करण्यात येणार आहे. एकाच वेळी दोन रस्ते फोडल्याने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. एमजी रोडवरून एखादा नागरिक निघाला तर त्याला अशोकस्तंभाकडे जायला मनाई आणि दुसरीकडे सीबीएसकडूनदेखील पुढे जाता येणार नाही. गंगापूररोडकडे जाणाºया नागरिकांना तर शालिमार, त्र्यंबक नाका मार्गे वळसा घालून जावे लागेल. अशा अनेक अडचणी आहेत.पोलिसांचा विरोध कायमस्मार्ट रोडच्या कामासाठी सीबीएस चौकात खोदकाम करून तो बंद असताना अशोकस्तंभ चौकातही खोदकाम करण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कंपनीला अशाप्रकारची परवानगी देण्यास सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) मंगलसिंह सूर्यवंशी नकार दिला आहे. तर त्यावर कंपनीचे सीईओ थविल बुधवारी (दि.२५) पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.मंगळवारी (दि.२४) यासंदर्भात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौघुले, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) मंगलसिंह सूर्यवंशी यांनी अशोकस्तंभ येथे पाहणी केली. सीबीएस पाठोपाठ हा चौक ऐन सणासुदीत खोदला गेला तर नागरिकांचे तर हाल होतीलच, परंतु व्यावसायिकांचे व्यवसाय आणखीनच ठप्प होतील, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या. दरम्यान, प्रभागाच्या नगरसेविका अॅड. वैशाली भोसले या दाखल झाल्या परंतु तोपर्यंत अधिकारी निघून गेले होते.
सीबीएस पाठोपाठ अशोकस्तंभ चौक खोदणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:54 AM