सातपूर : दिवाळीच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात पोलिसांचे गस्तीपथक दरवर्षीप्रमाणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ही सीसीटीव्ही यंत्रणा कोणकोणत्या ठिकाणी आवश्यक आहे याविषयी निमा, आयमा व अन्य औद्योगिक संघटनांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. तसेच कारखाने आणि मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी उद्योजकांनीही दक्षता घेणे आवश्यक असून, कंपनीतील व आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे सुव्यवस्थित असल्याची खात्री करून घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा व गस्तीसंदर्भात नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या सभागृहात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी उद्योजकांसमवेत संवाद साधला. व्यासपीठावर पोलीस उपायुक्त विजय खरात, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, कार्यवाह मिलिंद देशपांडे, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सचिव ललित बूब आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच त्यांनी नाशिक शहरात जवळपास १० पोलीस चौक्या स्थापन करण्यासाठी उद्योजकांनी सीएसआर निधींतर्गतून सहकार्य करण्याचेही आवाहन केले.तसेच पोलीस प्रशासनास विविध गुन्ह्यांची उकल करण्यात आलेल्या यशाची त्यांनी यावेळी माहिती देताना पोलीस आयुक्तांनी गस्ती पथकांकडून गस्तीदरम्यान क्यूआर कोड प्रणाली वापरली जाणार असल्याचे सांगितले.भंगार व्यापारावर निर्बंध लावण्याची मागणीऔद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस विभागासोबत सुरक्षेसंदर्भातील बैठकांमुळे दिवाळीच्या काळात होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आल्याचे मान्य करतानाच पोलिसांनी दिवाळीदरम्यान भंगार व्यापारावर निर्बंध लावण्याची मागणी केली. उद्योकांना धमकाविण्याचे, कामगारांना लुटण्याचे प्रकार घडत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याची अपेक्षाही यावेळी उद्योजकांनी व्यक्त केले.
औद्योगिक क्षेत्रातही सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:48 AM