लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : परिस्थितीने गरीब व गुन्ह्यात नकळत सहभागी झालेल्या दुर्बल घटकातील आरोपींच्या बचावासाठी केंद्र सरकारने डिफेन्स काउन्सीलचा प्रयोग देशपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात नाशिकच्यान्यायालयापासून करण्यात आली आहे. प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या या चीफ डिफेन्स काउन्सीलपदी अॅड. फारूख शेख यांची नियुक्ती करण्यात आली असून, या काउन्सीलसाठी स्वतंत्र कार्यालय व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.
विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने यापूर्वीही हलाखीची परिस्थिती असलेले व खटल्यात वकील देऊ न शकणा-या आरोपींच्या बचावासाठी सरकारकडून वकील देण्याची तरतूद होती. त्यासाठी वकिलांची नेमणूक केली जाते व त्यांनी चालविलेल्या खटल्याच्या प्रमाणात मेहनताना दिला जात होता. विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात येत असलेल्या या सुविधेचा अनेक आरोपींना लाभ घेतला असला तरी, आता त्याच धर्तीवर वरिष्ठ न्यायालयात (सेशन) चालणा-या गंभीर स्वरूपाच्या खटल्यांतील आरोपींनाही सरकारकडून बचावासाठी वकील देण्याची तरतूद करणारे चीफ डिफेन्स काउन्सीलची निर्मिती करण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला आहे. या काउन्सीलवर नेमण्यात येणा-या वकिलांची गुणवत्ता, न्यायदानातील योगदान आदी बाबी विचारात घेण्याबरोबरच ज्याप्रमाणे जिल्हा सरकारी वकिलांचे कार्यालय आहे, त्याच पद्धतीने चीफ डिफेन्स काउन्सील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात चीफ डिफेन्स काउन्सीलचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील आरोपींना शासन खर्चाने बचावासाठी वकील देण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी अलीकडेच विधी व सेवा प्राधिकरणाने वकिलांकडून काउन्सीलसाठी अर्ज मागविण्यात आले व त्यात पात्र ठरू पाहणाºया वकिलांच्या मुलाखती घेऊन त्यांना गुणवत्तेच्या आधारे नेमणुका देण्यात आल्या आहेत. दोन वर्षांसाठी त्यांची नेमणूक असेल. चीफ डिफेन्स काउन्सीलपदी अॅड. फारूख शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. रवी सांगळे, नीलेश राठी या दोघांची डेप्युटी चीफ डिफेन्स काउन्सील म्हणून तर असिस्टंट डिफेन्स काउन्सील म्हणून अॅड. विजय गुळवे यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. फारूख शेख यांनी यापूर्वी नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण, अमरावती, धुळे येथे सरकारी वकील म्हणून काम केले आहे. तसेच सरकारी वकिलांचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले असून, नाशिक पोलीस अकादमीत सहायक संचालक असताना प्रशिक्षणार्थींना कायद्याचे ज्ञान दिले आहे.